नेहमी गोठणबिंदूच्या आसपास आणि अनेकदा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली तापमान असणा्रा प्रदेश हा यंदा १८ जुलै २०२३ रोजी अमेरिकेतील डेथ व्हॅलीचे ५५° सेल्सिअस, कॅलिफोर्नियाचे तापमान ५०° सेल्सिअस, इटलीचे तापमान ४७° सेल्सिअस, फ्रान्स, उत्तर स्पेन, दुबई, इजिप्त, सर्बिया, बोस्निया, हर्जेगोविना, क्रोटिया, चीन या देशातील तापमान ४०° सेल्सिअस पेक्षा अधिक वाढले आहे. परिणामी हवाई यात्रा रद्द झाल्या आहेत.
यावर्षी देखील अवघ्या काही दिवसांत युरोपात उष्णता सहन न झाल्याने किमान २००० लोकांचे मृत्यू झाले आहेत. अशात जागतिक हवामान संघटनेने (WMO) देखील येत्या काळात तापमान अजून वाढेल असे सांगत रेड अलर्ट दिला आहे, जे अधिक चिंताजनक आहे. आरोग्य व्यवस्था पुन्हा कोलमडून पडली आहे. सुमारे १५०० बालकांना समुद्र किनारी सुरक्षित हलविले गेले आहे.
‘जेट स्ट्रीम’मुळे निर्माण झालेल्या हिट वेव्हच्या (उष्णतेची लाट) तडाख्यामुळे अमेरिका, चीनचा बराच भाग व युरोप पेटलाय. माणसांबरोबरच पशू-पक्षी देखील जीवाच्या आकांताने सैरभैर झाले आहेत. जंगलांना लागलेल्या आगी विझविण्याचे मोठं आव्हान उभे राहिले आहे. यामागे मागील वर्षाप्रमाणेच यंदा देखील 'जेट स्ट्रिम' म्हणजे अचानक वेगाने वाहणारे वारे हेच अमेरीका, चीन आणि युरोप भाजून निघण्यामागचे कारण आहे.
'जेट स्ट्रीम'चा पॅटर्न देखील बदलला!
सुर्यावरील घडामोडींमुळे मान्सून पॅटर्नबरोबरच 'जेट स्ट्रीम'चा पॅटर्न देखील बदलला आहे. याचमुळे युरोप, अमेरिका व चीन भाजून निघतो आहे. सबट्रॉपिकल जेटमुळे युरोपमध्ये स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलंड, नॉर्वे, युनायटेड किंग्डम म्हणजे यूके इत्यादी देशांत लाखो लोक होरपळत आहेत. पिण्याच्या पाण्याचे देखील दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
२०२२ मध्ये अमेरिकेत हिमवादळामुळे आणि युरोपात जेट स्ट्रीमच्या चटक्यांनी भाजत व महापूरांनी झालेले हजारो मृत्यू व तांडव नृत्याने केलेल्या नुकसानीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. मे ते ऑगस्ट २०२२ या चार महिन्यांत युरोपात हिटव्हेवने होरपळून किमान ६१ हजार ६०० मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद झाली आहे.
१८ जुलै ते २४ जुलै २०२२ या सहा दिवसांच्या कालावधीत युरोपात ११ हजार ६३७ इतके लोक उष्णतेमुळे तडफडून गतप्राण झाले हे विदारक सत्य आहे. ऑस्ट्रेलिया व कॅलिफोर्नियातील जंगलांच्या आगी आणि फ्रान्स, जर्मनी व चीन सह अनेक देशांत आपण पाहत आहोत.
उष्णतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, शिवाय जंगलांना लागलेल्या आगीत मोठ्या संख्येने पशुपक्ष्यांचे बळी गेले. परिणामी या समस्येला तोंड देण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. सुर्यावरील घडामोडी यामुळे उत्तर भारतात देखील अचानक ढगफुटींचे प्रमाण वाढले आहे.
'जेट स्ट्रिम' म्हणजे नेमके काय?
'जेट स्ट्रिम' हे १० ते १५ किलोमीटर उंचीवरून अत्यंत वेगवान वाहणाऱ्या वाऱ्याचे अरुंद पट्टे किंवा प्रवाह आहेत. जेट स्ट्रिम हे मुख्यतः पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे वाहतांना संपूर्ण जगभर आढळतात. पृथ्वीवर चार प्राथमिक जेट प्रवाह आहेत: दोन ध्रुवीय जेट प्रवाह, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ आणि दोन समशितोष्ण कटिबंधीय जेट प्रवाह विषुववृत्ता पासून साधारणतः ३० ते ४० अक्षांशावर वाहतात.
असा लागला ’जेट स्ट्रीम’चा शोध !
’जेट स्ट्रीम’च्या शोधाचे श्रेय ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ जेम्स ग्लेशर यांना जाते. १८६० च्या दशकात वातावरणात सोडलेल्या बलूनद्वारे प्रयोग करताना अचानक वेगाने बलून गायब होत होते. त्याचा अभ्यास केला असता त्यांना १२० किलोमीटर प्रतितासापर्यंत वेगाने वाहणारे वारे म्हणजे 'जेट स्ट्रिम'चा शोध लागला. त्यानंतर ५० वर्षांनंतर म्हणजे १९१० मध्ये जपानी हवामानशास्त्रज्ञ वासाबुरो ओईशी यांनी जेट प्रवाहाच्या अस्तित्वाचा स्पष्ट पुरावा देत पुन्हा शोध लावला. गंमत म्हणजे तोपर्यंत वातावरणाचा अभ्यास करण्यात नेहमी अग्रेसर असणार्या अमेरिकन लोकांना याची पुसटशीदेखील कल्पना नव्हती, हे विशेष!
प्रा. किरणकुमार जोहरे
(आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ आणि हवामान शास्त्रज्ञ)
संपर्क :9168981939, ई-मेल : kirankumarjohare2022@gmail.com