Amravati Rain :
अमरावती :
पावसाला हा १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान गृहीत धरला जातो. किंबहुना शासनाचे १४ ही तालुक्यांमधील आपत्ती निवारण केंद्र २४ बाय ७ या दरम्यान सुरू राहतात. आता मात्र यात शिथिलता येणार आहे.
'महावेध' द्वारा रोजच्या पावसाची आकडेवारी, जलसंपदा विभागाद्वारा रोजचा पाणीसाठा आता नियमित दिला जाणार नाही. शिवाय शासनाच्या लेखी १ ऑक्टोबरपासून पडणारा पाऊस हा मान्सूनचा नव्हे तर अवकाळी गृहीत धरण्यात येणार आहे.
जिल्ह्यत १ जून ते २९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ८५६.९ मिमी पाऊस अपेक्षित असला तरी प्रत्यक्षात ८१९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही ९५.६ टक्केवारी आहे.
मागील वर्षी याच कालावधीत ५९०.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. ही ६८.९ टक्केवारी होती. यावर्षीचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे.त्यानंतर १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या परतीच्या पावसाची शासन दप्तरी नोंद अवकाळी राहणार आहे,
जिल्ह्यात १ जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होत असते. त्यापूर्वी मे महिन्यापासून जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू असते. मान्सून पूर्वतयारीचा जिल्हा व विभागस्तरावर आढावा घेतला जातो तसेच तालुकास्तरावर १४, जिल्ह्याचा व विभागाचा प्रत्येकी एक असे १६ नियंत्रण कक्ष १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत २४ बाय ७ सुरू असतात.
यामध्ये पावसाळ्याच्या कालावधी पश्चात शिथिलता येते. यंदा मात्र सध्या परतीचा पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यांचे नियंत्रण कक्ष दसऱ्यापर्यंत सुरुच राहणार असल्याची माहिती आहे.
नऊ तालुक्यांत सरासरी पार, पाचमध्ये तूट
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या १२९ टक्के पाऊस हा चांदूर बाजार तालुक्यात झालेला आहे. मागील वर्षी अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यांत सर्वाधिक कमी पाऊस झाला होता.
यावर्षी दर्यापूर तालुक्यात सरासरीच्या १२५.७ टक्के व अंजनगाव सुर्जी तालुक्यात १२७.८ टक्के पाऊस झाला. सोबतच चिखलदरा तालुक्यात १०४.६, नांदगाव खंडेश्वर ११९.५, चांदूर रेल्वे ११६.६, तिवसा ११३.९. मोर्शी १०३.८, वरूड १०८.६ तालुक्यात झाला. उर्वरित पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.
१ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान पावसाळा गृहीत धरण्यात येतो. त्यानंतरच्या पावसाची अवकाळी पाऊस म्हणून नोंद होते. पावसाळ्याच्या काळात सुरू करण्यात आलेल्या तालुका नियंत्रण कक्षात यानंतर थोडी शिथिलता येते. -अनिल भटकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सीईओ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण