निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरले जाऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून लाभक्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरण्यासाठी अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली.
निळवंडे कालव्यांची चाचणी पूर्ण झाल्यामुळे कधी गावात पाणी येते यासाठी लाभक्षेत्रातील नागरिक डोळे लावून बसले होते. बुजविण्यात आलेले ओढे, नाले आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने उकरण्यात आले. सिमेंट पाईप देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुरुवार (दि.१६) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.
या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या मागणीनुसार निळवंडे डाव्या कालव्याला अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली असून कोपरगाव मतदारसंघातील निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरून दिले जाणार आहेत. या बैठकीसाठी निळवंडे डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, कार्यकारी अभियंता सोनल सहाणे, उपकार्यकारी अभियंता विवेक लव्हाट आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.
या गावांना होणार फायदा
पाझर तलाव भरल्याचा फायदा काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद तसेच मतदारसंघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांना होणार असून त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून चातकासारखी निळवंडेच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या या गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.