Join us

उजनीतून शेतीला पाणी सोडण्यासाठी 'एवढी' वाढ अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 2:33 PM

दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये सोमवारी सायंकाळी पुन्हा निम्म्याने घट झाली आहे. रविवारी सायंकाळी १२२५५ क्युसेकने येणाऱ्या निसर्गामध्ये ...

दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये सोमवारी सायंकाळी पुन्हा निम्म्याने घट झाली आहे. रविवारी सायंकाळी १२२५५ क्युसेकने येणाऱ्या निसर्गामध्ये घट होऊन तो ६४५८ क्युसेक एवढा वाढला आहे. असे असले तरी उजनी धरणात मागील २४ तासांत पुन्हा १ टीएमसी पाण्याची भर पडली असून, टक्केवारीही २ ने वाढून २२. १४ झाली आहे. धरणातून शेतीला पाणी सोडण्यासाठी धरण 33 टक्के होण्याची प्रतीक्षा आहे. त्यासाठी आणखी ११ टक्क्यांची गरज आहे.

सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या सर्व धरण क्षेत्रात पुणे जिल्ह्यात फक्त १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचा अर्थ पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडणारा पाऊस जवळपास थांबला आहे. ही उजनी धरणाच्या जलसाठ्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. असे असले तरी उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या १९ धरणांपैकी १२ धरणे जवळपास शंभर टक्के भरली आहेत.

धरणाची सद्य:स्थिती

एकूण पाणीपातळी ४९२.६१० मीटर

एकूण जलसाठा: ७५.५२ टीएमसी

उपयुक्त जलसाठा: ११.८६ टीएमसी

टक्केवारी:  २२.१४ %

-इन्फ्लो ६४५८ क्युसेक

उजनीवरील १९ धरणांतील परिस्थिती

पिंपळ जोगे ७८ टक्के, माणिकडोह ६९ टक्के, येडगाव २७ टक्के, डिंभे ९८ टक्के, घोड ३३ टक्के, विसापूर २६ टक्के, चिल्ल्हेवाडी ६२ टक्के, चासकमान १००टक्के, भामा सखेड ९५ टक्के, वडिवळे १००टक्के, आंध्रा १०० टक्के, पवना १०० टक्के, कासारसाई १०० टक्के, मुळशी ९१ टक्के, टेमघर ८० टक्के, वरसगाव ९९.५५ टक्के, पानशेत १०० टक्के व खडकवासला ५२ टक्के.

टॅग्स :धरणउजनी धरणसोलापूरपाणीपाऊसमोसमी पाऊस