जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा करण्याचे अद्याप आदेश नसल्याने धरणाचे पुन्हा दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणात ७५.५ टक्के पाणीसाठा आहे. रविवारी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांच्या वर गेल्याने प्रशासनाने दुपारी ३ वाजता दोन दरवाजे ०.१५ मीटरने उघडून त्यातून १०१६ मी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
यंदा निम्न दुधना प्रकल्प सर्वत्र जोरदार झालेल्या पावसाने ओसंडून वाहिला. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून या धरणाची पाणी साठवण क्षमता घटविण्यात आल्याने सध्या धरणात केवळ ७५ टक्केच पाणीसाठा आहे. धरणात १०० टक्के पाणीसाठा केल्यास शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीत पाणी जाऊन पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांनी धरणाचे पाणी असलेल्या जमिनी संपादित करून मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.
मात्र, शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून मोबदला देण्याऐवजी धरणाची पाणी साठवण क्षमताच घटवली आहे. त्यामुळे धरणात सध्यातरी ७५ टक्केच पाणीसाठा करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रशासनाने धरणाचे आठ दरवाजे उघडले होते. आता आणखी दोन उघडले आहेत.
यंदा समाधानकारक पाऊस
गेल्या वर्षी सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईचे सावट परसले होते. परंतु, यंदा जून महिन्यातील मृग नक्षत्रापासूनच समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पिके चांगली बहरली आहे. त्यामुळे शेतकरी समधान व्यक्त करीत आहे.
अद्याप आदेश नाहीत
सध्या धरणात शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे आदेश नाहीत. आता धरणात ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्यामुळे वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. सध्या दोन दरवाजांतून पाणी सोडण्यात आले आहे. - बी. डी. मार्गे, अभियंता.