राज्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर रुप घेताना दिसत असून वाढत्या तापमानासह धरणातीलपाणीसाठा वेगाने घटत आहे. जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्याच्या मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये एप्रिलअखेर आज २९.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळ्याला अजून एक महिना बाकी असून तापमान वाढणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. परिणामी बाष्पीभवन वाढले असून धरणसाठा वेगाने घटत आहे.
राज्यातील एकूण धरणसाठ्यात आता ११ हजार ८७३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असून आज दि ३० एप्रिल रोजी १३.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ४९ टक्के एवढा होता.
नाशिक व पुणे विभागातील पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. नाशिकच्या लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये आता ३२.१५ टक्के पाणी शिल्लक असून पुणे विभागातील ७२० धरणांमध्ये २५.०९ टक्के पाणीसाठा उरला आहे. परिणामी, नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
जायकवाडी धरणात ८.९९ टक्के
छत्रपती संभाजीनगर विभागात राज्यातील सर्वात कमी पाणी शिल्लक आहे. दरम्यान मराठवाड्याच्या हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात ८.९९ टक्के पाणी शिल्लक आहे.
पुण्यातील भाटघर धरण १०.३८ टक्क्यांवर
पुण्यातील सर्वाधिक क्षमतेचे भाटघर धरण आता १०.३८ टक्क्यांवर आले आहे. नीरा देवघरमध्ये १४.३४ टक्के तर पानशेत २६.६४ टक्क्यांवर आहे.
नाशिक गिरणा २२ टक्क्यांवर
नाशिकचे गिरणा धरण २२ टक्क्यांवर गेले असून कडवा १९.२१, मुकणे ३३.९८, दारणा २४.३५ टक्क्यांवर गेले आहे.
नगरच्या निळवंडे धरणात २७.६७
नगरच्या निळवंडे धरणत आता २७.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर मुळा धरणात २०.३६ टक्के, भंडारदरा धरणात ३८.०३ टक्के पाणी शिल्लक आहे.
उजनी शुन्यावर
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कधीच शुन्यावर पोहोचले असून पाणी जोत्याखाली गेले आहे. परिणामी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.