Join us

राज्यात सरासरी ३१.८० टक्के जिवंत पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 20, 2024 11:16 AM

कोणत्या विभागात किती पाणीसाठा राहिलाय? जाणून घ्या सविस्तर

Dam water Maharashtra live: राज्यात उन्हाच्या तीव्रतेसह पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. आज दि २० एप्रिल रोजी राज्यातील लघू, मध्यम व मोठ्या धरणप्रकल्पांमध्ये सरासरी ३१.८० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.

मागील वर्षी सरासरीहून कमी पाऊस झाल्याने यंदा मार्चपासूनच जलसाठे कोरडे होऊ लागल्याचे चित्र होते. विहिरी, ओढे ओस पडत असून धरणे जोत्याखाली जाऊ लागली आहेत. परिणामी पाण्यासाठी राज्यातील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकरवाऱ्या वाढल्या असून हजारो गावे तहानलेली आहेत.

धरणसाठा वेगाने कमी होत असून  राज्यातील २९९४ धरणांमध्ये आता केवळ १२ हजार ८७४ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ३१.८० टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२.२३ टक्के कमी जलसाठा आहे.

महाराष्ट्रातील सहा महसूल विभागात धरणसाठ्यात वेगाने घट होत असून औरंगाबाद विभागाचा पाणीसाठा १५.३९ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. पुणे विभागात सरासरी २८.८६ टक्के पाणी शिल्लक असून नाशिक ३३.५३%, नागपूर ४२.९८%, कोकण ४५.३६% व अमरावती विभागात ४५.५२% धरणसाठा शिल्लक आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या तुलनात्मक आकडेवारीनुसार राज्यातील एकूण १३८ मोठ्या धरणांमध्ये ३०.७० टक्के पाणी शिल्लक आहे. मध्यम धरणांची स्थितीही साधारण अशीच असून ३८.९३ टक्के तर लघू धरणांमध्ये ३०.५९ टक्के पाणी उरले आहे.

टॅग्स :धरणपाणीकपातपाणीमहाराष्ट्र