गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात सुरू असलेला वादळी पाऊस आणि गारपीट पिच्छा सोडायला तयार नाही. शनिवारीही मराठवाड्यासह कोकणातील अनेक भागात वादळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे.
लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. काही भागात गाराही पडल्या. यामुळे आंबा, द्राक्षांच्या बागांसह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि अन्य तालुक्यातही सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. कोल्हापुरातही सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवड आणि रत्नागिरी तालुक्यातील पाली आणि संगमेश्वर तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.
रस्त्यावर पडला कैऱ्यांचा सडा
■ पारनेर तालुक्यातील गोरेगावला शनिवारी दुपारी वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जोराच्या वाऱ्याने झाडे मोडून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली, तर कैऱ्यांचा रस्त्यावर सडा पडला. पाऊस इतका जोराचा होता की शेतात पाणी साचले होते. पारनेर-डिकसळ मार्गे गोरेगावकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवेवरच आंब्याची झाडे उन्मळून पडली. वाहतूक तर थांबलीच शिवाय सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने वस्तीवर राहणारे लोक भयभीत झाले होते.
कांदा उत्पादकांची झाली धावपळ
पारनेर तालुक्यात सध्या शेतात कांदा काढण्याचे काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतातच पडला आहे. वादळाची चाहूल लागताच कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली होती.
कुठे अवकाळी, तर कुठे उन्हाळा
उष्णतेच्या लाटांसह अवकाळी पावसाने नागरिकांना नकोसे केले असून, हवामान बदलाचा हा कहर सुरूच आहे. आता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांत एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासोबत हलका पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तर मुंबईतील उष्णतेची लाट ओसरली असली तरी आर्द्रतेत चढउतार असल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी उष्ण व दमट परिस्थिती राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी रात्री हवामान उष्ण राहील. २९ जिल्ह्यांत या सप्ताहात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.