नवी दिल्ली : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पॅरिस करारात निश्चित केलेल्या मर्यादेनुसार, वार्षिक तापमानात १.४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने २०२३ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचे जागतिक हवामान संस्थेने (डब्ल्यूएमओ) जाहीर केले.
२०२३ मध्ये जून ते डिसेंबरपर्यंत दर महिन्याला जागतिक तापमानाने नवा उच्चांक गाठला. त्यातही जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने वर्षभरातील सर्वाधिक उष्ण महिने ठरले. मागील वर्षात वार्षिक सरासरी तापमानात १.४५ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली.
अधिक वाचा: उसाच्या पिकात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स कसे काम करते?
जागतिक तापमानवाढ मोजण्यासाठी डब्ल्यूएमओने सहा वेगवेगळ्या परिमाणांचा आधार घेतला. त्यात प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, युरोप, जपान या देशांतील अहवालांसह नासाच्या माहितीचाही आधार घेतला.
पॅरिस करार काय आहे?
पूर्व औद्योगिक कालावधीतील (१८५०-१९००) पातळीपेक्षा सरासरी जागतिक तापमानवाढ २ अंशांपेक्षा कमी आणि १.५ अंशांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे पॅरिस करारात निश्चित केले होते. १.५ अंशांपेक्षा अधिक तापमानवाढ झाल्यास त्याचा निसर्गासह मानवजातीवरही भीषण परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली होती.
हवामान बदल हे सध्या जगापुढील सर्वात मोठे संकट आहे. तापमानवाढ नियंत्रणासाठी अक्षय ऊर्जास्रोतांवर भर देण्याची आवश्यकता आहे. - सेलेस्टे सोलो, डब्ल्यूएमओ
एक मोठे संकट आपल्यापुढे आ वासून उभे आहे. वेळीच तातडीच्या उपाययोजना न केल्यास मोठा फटका बसणार आहे. - अँटोनियो गुटारेस, महासचिव, संयुक्त राष्ट्रे