मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी लागत असून बीड जिल्ह्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. ओढे, नालेही ओसंडून वाहतानाची चित्र समाजमाध्यमांवर फिरत असताना जिल्ह्यातील धरणासाठे अजुनही शुन्यावर असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
बीड जिल्ह्यातील शेकडो गावांची तहान भागवणारे सर्वात अधिक क्षमतेचे माजलगाव धरण अजूनही शुन्यावरच असल्याची माहिती जलसंपदा विभागाने जाहीर केली. तसेच मांजरा धरणातही शुन्य टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याने अनेक गावे तहानलेलीच असल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्यात लहान मोठे ८ जलप्रकल्प आहेत. यातील १४२.३० दलघमी क्षमतेचे माजलगाव धरण मागील वर्षी २१.५८ टक्के भरले होते. यंदा ते अजूनही शुन्यावरच आहे. तसेच मांजरा धरण मागील वर्षी २२.२४ टक्क्यांवर होते. जे आज शुन्यावर असल्याचे समोर येत आहे.
जिल्ह्यात यंदा शेतीसह जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शेततळी, विहिरी कोरडीठाक पडली होती. आता पावसाला सुरुवात झाल्याने तापमानापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिण्याचा आणि शेतीचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अजूनही काही प्रमाणत तीव्र असल्याचे दिसून येत आहे.