बीड जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे पाण्याची परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे. जिल्ह्यातील १४३ लहान-मोठ्या धरणात एकूण ५८ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. गणपती आगमनाच्या दिवशी बीड शहरासह अनेक ठिकाणी पाऊस झाला, त्यामुळे वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. लहान-मोठ्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याची सुखद वार्ता आहे.
जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत फारसे मोठे पाऊस झाले नाहीत. जून महिन्यापासून रिमझिम पाऊस झाला. नंतर मोठ्या प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पेरण्या करता आल्या. मागील महिन्यात धरणांतील पाणी पातळी केवळ १५ टक्क्यांवर होती. परंतु त्यानंतर झालेल्या पावसामुळे परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे. १ ते २ सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सलग २४ तास संततधार होती.
यामुळे बिंदुसरा प्रकल्प ओसंडून भरून वाहू लागला. बिंदुसराचे पाणी नद्यांच्या मार्गे माजलगाव धरणास जाऊन मिळाले. तसेच माजलगाव परिसरात सुद्धा थोडाफार पाऊस याच कालावधीत झाला होता. त्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी ३५ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे.
... अशी आहे तालुकानिहाय पाणी स्थिती
तालुका | एकूण प्रकल्प | उपयुक्त साठा (दलघमी) | टक्केवारी |
बीड | २१ | ५०,०७८ | ७६.४४ |
गेवराई | ७ | ०.९०२ | ७.३५ |
शिरूर | ११ | २०.७६४ | ५७.८३ |
पाटोदा | १३ | २७.५०८ | ९९.५७ |
आष्टी | २९ | ६९.१२४ | ८६.२३ |
केज | १५ | ८.३४८ | २७.२४ |
धारूर | ७ | १५.१६५ | ७९.४६ |
वडवणी | १० | ४६.८३० | ८६,५० |
अंबाजोगाई | १२ | १८.५७५ | ८०.८६ |
परळी | १३ | ४८.९५५ | १०० |
माजलगाव | ५ | १११.६५० | ३५.०५ |
एकूण | १४७ | ४१७.८८९ | ५८.३८ |
जिल्ह्यात परतीचा पाऊस अधिक
बीड जिल्ह्यात परतीचा पाऊस अधिक असतो असे सांगितले जाते. २०१६-१७ मध्ये परतीच्या एकाच पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे भरली होती. त्यामुळे यंदाही अशीच परिस्थिती राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना आहे.
८० प्रकल्प १०० टक्के भरले
■ बीड जिल्ह्यातील १४३ पैकी ८० प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. अद्यापही अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू आहे. हळूहळू सर्व प्रकल्प भरतील, अशी शक्यता आहे.
■ अनेक ठिकाणी असलेल्या धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने जिवंत पाणीसाठा वाढत चालला आहे.
■ माजलगाव प्रकल्पात सध्या ३४ टक्के पाणीसाठा आहे तर बिंदुसरा, सिंदफणा, महासांगवी, कडा, कडी, रुटी, कांबळी, वाण, बोरणा, बोधेगाव, सरस्वती, कुंडलिका ही धरणे १०० टक्के भरली आहेत.
जायकवाडीचा फारसा लाभ नाही
जायकवाडी धरणातून माजलगाय धरणासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. काही दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले होते, त्यानंतर आता जायकवाडी प्रकल्प ९४.५ टक्के भरले असल्याने अतिरिक्त पाणीसाठा सोडला जाणार आहे. हे पाणी गेवराई तालुक्यातील कालव्या शेजारील शेतीसाठी उपयुक्त ठरते. जायकवाडीतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा लाभ माजलगाव धरणासाठी होत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.