भंडारदरा धरण आज सहा वाजता 100 टक्क्याने भरले असून 820 क्यू. ने धरणातून विसर्ग सुरू आहे. तसेच निळवंडेतून १ हजार ७५० क्यूसेकने पाणी जायकवाडीकडे येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील हरीश चाकोर यांनी दिली.
दरम्यान, काल भंडारदरा धरण ९८.१० टक्क्यांनी भरले होते. मागील दोन दिवसांपासून मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत आहे. भंडारदरा धरण 100% भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भंडारदरा धरणात सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत ४२७ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली होती. त्यानंतर चार तासांत ६९ दशलक्ष घनफुटांपेक्षा अधिक पाण्याची आवक झाली आणि पाणीसाठा ९ हजार २०० दशलक्ष घनफुटापेक्षा अधिक झाला. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या स्पिलवे गेटमधून सकाळी दहा वाजता २ हजार ३६२ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
निळवंडे धरणात आता ६८१२ Mcft पाणीसाठा असून हे धरण ८१. 79 टक्क्यांनी भरले आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून एक हजार सातशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात हे पाणी येणार आहे.