Join us

Bhandardara Dam : भंडारदरा ४४ वर्षांत आठव्यांदा झाले १५ ऑगस्टपूर्वी ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:33 AM

भंडारदरा धरण निर्मितीने ९९ व्या वर्षात पदार्पण केले असून, गेली ४४ वर्षांत १९८० पासून जलाशय आठवेळा १५ ऑगस्टपूर्वी तर २१ वेळा ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे.

हेमंत आवारीअकोले : भंडारदरा धरण निर्मितीने ९९ व्या वर्षात पदार्पण केले असून, गेली ४४ वर्षांत १९८० पासून जलाशय आठवेळा १५ ऑगस्टपूर्वी तर २१ वेळा ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे.

यंदा ४ ऑगस्टलाच स्पिलवेतून २८ हजार २४४ क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. १५ ऑगस्टपूर्वी भंडारदरा ओसंडून वाहण्याची आठवी वेळ ठरली.

भंडारदरा धरण २०२० साली १५ ऑगस्टला रात्री उशिरा पूर्ण भरल्याचे घोषित करून १६ ऑगस्टला पहाटे स्पिलवेमधून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. २०२१ ला १२ सप्टेंबर रोजी, २०२२ ला १६ ऑगस्ट रोजी, २०२३ ला २८ ऑगस्ट रोजी भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याची नोंद आहे.

भंडारदरा जलमंदिर उभारणीला ९८ वर्षे पूर्ण झाली असून, गेल्या ४४ वर्षांत केवळ आठवेळा १५ ऑगस्टपूर्वी धरण ओव्हरफ्लो झाल्याची नोंद आहे. २०१९ ला २ ऑगस्ट रोजी तांत्रिकदृष्ट्या तर १७ ऑगस्ट रोजी अधिकृत धरण पूर्ण भरल्याची घोषणा करण्यात आली होती. २०१८ ला स्वातंत्र्यदिनाला धरण ओव्हरफ्लो झाले होते.

२००५ व २०११ साली धरण १४ ऑगस्टला पूर्ण भरले होते. १९०५ साली धरणाच्या जागेचे सर्वेक्षण होत १९१० साली धरणाच्या कामाला सुरुवात झाली. सन १९२६ ला दगड- गूळ चुन्यातील या धरणाचे काम पूर्ण झाले. १९२२ साली धरणात पाणी साठवायला सुरुवात झाली.

आधी पाट-कालवे नंतर धरण• अवघे ८४ लाख रुपये खर्चुन भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे.• आधी शेती सिंचनासाठी पाट-कालवे नंतर गूळ-चुनाखडी वापरून दगडात रेखीव भक्कम धरणाची उभारणी करून ब्रिटिशांनी साकारलेल्या 'अर्थर लेक मधील पाणीसाठ्याच्या आधारावरच लाभक्षेत्रात ऊस बागायती फुलली आहे.

कधी ? कसे भरले भंडारदरा• १९८० पासून आतापर्यंत १९९०, २००५, २०११, २०१८, २०१९, २०२०, २०२१, २०२४ असे आठवेळा १५ ऑगस्टपूर्वी तर गेल्या ४४ वर्षांत २१ वेळा ऑगस्ट महिन्यातच भंडारदरा ओसंडल्याची नोंद आहे.• केवळ सातवेळा म्हणजे १९८५, १९८६, १९८७, १९८९, १९९५, २००० व २०१५ ला धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही.

टॅग्स :धरणपाणीपाऊसशेतीपाटबंधारे प्रकल्प