Join us

भंडारदरा जलाशय ८३ टक्के भरला

By बिभिषण बागल | Published: July 25, 2023 10:19 AM

सोमवारी सकाळी दहा वाजता भंडारदरा जलाशयातील पाणीसाठा ८३ टक्के झाला आणि धरणाच्या स्पिलवे गेटचे दरवाजे उघडण्यात आले. या धरणातील ...

सोमवारी सकाळी दहा वाजता भंडारदरा जलाशयातील पाणीसाठा ८३ टक्के झाला आणि धरणाच्या स्पिलवे गेटचे दरवाजे उघडण्यात आले. या धरणातीलपाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सायंकाळी सहा वाजता धरणातून ४ हजार २९७ क्युसेकने पाणी प्रवरा नदीच्या पात्रात सोडण्यात आले.

दरम्यान, मुळेचा कोतूळजवळील विसर्गही सोमवारी दुपारी बारा वाजता ११ हजार १५२ क्युसेक इतका झाला होता. या मोसमातील आजपर्यंतचा हा सर्वाधिक विसर्ग आहे. मागील दोन दिवसांपासून मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत आहे.

भंडारदरा धरणात सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत ४२७ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली होती. त्यानंतर चार तासांत ६९ दशलक्ष घनफुटांपेक्षा अधिक पाण्याची आवक झाली आणि पाणीसाठा ९ हजार २०० दशलक्ष घनफुटापेक्षा अधिक झाला. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या स्पिलवे गेटमधून सकाळी दहा वाजता २ हजार ३६२ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यानंतरही दिवसभरात नवीन पाण्याची आवक वाढत असल्याने दुपारी बारा वाजता या विसर्गात वाढ करत तो ३ हजार ४६२ क्युसेक करण्यात आला. याबरोबरच वीजनिर्मितीसाठी ८३५ क्युसेकने विसर्ग सुरूच होता. दरम्यान सायंकाळी सहा वाजता धरणातून एकूण ४ हजार २९७ क्युसेक्सने विसर्ग सुरू केल्याचे सांगण्यात आले.

कळसुबाई शिखर परिसरातही आज दिवसभर पावसाची सततधार सुरूच असल्याने वाकी येथील लघु पाटबंधारे तलावावरून नदीपात्रात पडत असलेल्या पाण्याच्या विसर्गातही वाढ झाली असून सायंकाळी सहा वाजता तो ७८९ क्युसेकपर्यंत पोहोचला होता. या पाण्याबरोबरच भंडारदरा धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे आता निळवंडे धरणातील पाणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातील पाणीसाठा ३ हजार ५१२ दशलक्ष घनफूट इतका झाला होता. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगड परिसरातील आंबित, पाचनई, शिरपुंजे परिसरातही रविवारी रात्री व सोमवारी सकाळी पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सोमवारी सकाळी मुळेच्या विसर्गात वाढ होत तो ६ हजार ५९२ क्युसेक इतका झाला होता तर दुपारी बारा वाजता तो ११ हजार १५२ क्युसेकपर्यंत पोहोचला होता. सायंकाळी सहा वाजता मुळा धरणातील पाणीसाठा १३ हजार ४५६ द.ल.घ.फू. इतका झाला होता. 

टॅग्स :हवामानपाऊसधरणपाणी