मागील एका आठवड्यापासून राज्यभर चांगल्या पावसाने हजेरी लावली असून विदर्भ आणि मराठवाड्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. या धरणातून आज प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार कालपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाली असून भंडारदरा धरणात पाणी आवक सुरू आहे. धरण १०० टक्के भरले असून पूर्ण साठा संचय पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून आज दुपारी ३.०० वाजता ४ हजार ३१५ क्युसेक्स इतका पाणी विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे.
भंडारदरा धरणातून करण्यात आलेला विसर्ग थेट निळवंडे धरणामध्ये जमा होतो व त्यामुळे निळवंडे धरणातून देखील दुपारी साडेतीन वाजल्यापासून ४ हजार ४६० क्युसेक्स इतका पाणी विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आले आहे.