Join us

भंडारदरा, निळवंडे धरणाची आवर्तने पूर्णपणे बंद, आता केवळ दिली जाणार दोन आवर्तने

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 29, 2024 11:24 AM

जलसंपदा विभागाची माहिती

Bhandardara- Nilvande Dam Water Update: राज्यातील धरणांमधीलपाणीसाठा तळाला पोहचत असताना आता अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणांची पिण्याच्या पाण्याची आवर्तने पूर्णपणे बंद झाल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. पिण्याच्या पाण्याची आता केवळ दोन आवर्तने सोडण्यात येणार असून साधारण ५०० ते ६०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवर्तने देऊ असेही सांगण्यात आले आहे.

धरणांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात आता धरणांनी तळ गाठला आहे. मागील वर्षी भंडारदरा धरणात ५४.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो आता ९.४९ टक्क्यांवर आला आहे. तर निळवंडे धरण गतवर्षी ३५.३८ टक्के भरले हाेते. यंदा निळवंडे धरणात केवळ ७.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची माहिती से.नि अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी ‘लोकमत ॲग्रो’शी बोलताना दिली.

नगरमधील दीडशे गावे तहानलेली..

अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे सहा तालुक्यांची तहान भंडारदरा आणि निळवंडे धरणावर अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती, सिंचन, कारखानदारी, नगरपालिका, नगरपरिषदांसह प्रवरा नदीकाठच्या अनेक योजना या पाण्यावर अवलंबून आहेत. अकोले, संगमनेर तालुक्यातीलच जवळपास १०० ते १५० गावं या धरणांवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. तसेच राहता, श्रीरामपूर तालुक्यांमध्ये पाटाच्या पाणी सोडल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठीही उपसा होतो.

शेतीला आवर्तने नाहीच!

जिल्ह्यात पुढील एक दोन आठवड्यात पाऊस आला नाही तर धरणे मृत साठ्यात जातील. भंडारदऱ्यात केवळ ९ टक्के पाणी उरले आहे. ३१ जूलैपर्यंत पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी असते. आता केवळ १ ते १.५ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. एवढ्या पाण्यात आता फक्त पिण्याच्या पाण्याची दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. एक आवर्तन मेमध्ये होईल आणि पाऊस नाही पडला तर दुसरे जुलैमध्ये होईल. आपत्कालिन स्थितीमध्ये राहिलेले दोन्ही धरणांचे पाणी पिण्यासाठीच वापरले जाईल. शेतीला पाणी देताच येणार नाही.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये टँकरचे प्रमाण वाढले

अहमदनगर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईने शेतकऱ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्ह्यात टँकरचे प्रमाण वाढले असून दररोज सुमारे १००० टँकर लागत असल्याचे सांगितले जात आहे.

धरण पर्यटनाच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम

अहमदनगर भागात राज्यातील सर्वाधिक धरणे असून भंडारदरा, निळवंडे या भागात अनेक पर्यटकांचा ओढा असतो. आता धरणसाठा तळाला गेला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात पर्यटनाला आर्थिक फटका बसणार आहे. नदीपरिसरात थोडी हिरवळ असली तरी रखरख वाढली आहे.

गोदावरी,कृष्णा खोऱ्यात पाणी वळवा

सद्यस्थितीत नगर, नाशिक व मराठवाड्यासह राज्यांमध्ये बहुतांश धरणांमधील पाणी साठ्याने तळ गाठला असून बरीच धरणे कोरडी देखील पडलेली आहेत. नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून पश्चिम घाटा माथ्यावरून कोकणात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी हे गोदावरी खोरे, कृष्णा खोरे ,तापी खोऱ्यामध्ये वळविण्याची मागणी करण्यात येत आहे.

पाण्याचा शाश्वत स्राेत निर्माण होणे गरजेचे

जलजीवन मिशन अंतर्गत हजारो कोटींचा खर्च करून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा उन्हाळ्यात काही उपयोग होत नसून पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठा पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी नदी खोऱ्यांमधील तसेच धरणांमधील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवणे गरजेचे आहे.

नदीजोड प्रकल्प म्हणा किंवा पाणी वळण योजना या प्रकल्पांच्या माध्यमातून हाती घ्यावा व खऱ्या अर्थाने जल जीवन योजनांचे जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होईल व तसेच सिंचनाचा प्रश्न देखील बऱ्याच अंशी सुटू शकेल अन्यथा बोलाचीच कडी,व बोलाचाच भात होऊन शेवटी जनतेमध्ये मोठा रोष निर्माण होत असून शासनाने सिंचनाचा प्रश्न गांभीर्याने सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे.- हरिश्चंद्र चकोर, सेनि अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :धरणपाणीधरण पर्यटनअहमदनगरशेतीभंडारापाणी टंचाई