भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) शनिवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी पूर्णक्षमतेने भरल्यामुळे धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजांतून (मोऱ्या) निरा नदीपात्रात सुमारे ३५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे धरण भरल्यामुळे पूर्व भागातील तालुक्यातील पिकासह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता २३ टीएमसी आहे. शनिवारी १००% टक्के पाणीसाठा झाला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस शुरू असून, धरणात पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन वर्षापेक्षा १० दिवसा अगोदरच धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे प्रशासन, पाटबंधारे विभागाने नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आहेत.
तसेच धरणाच्या ४५ स्वयंचलित दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाला एकूण ८९ दरवाजे असून यामध्ये ४५ स्वयंचलित, ३६ अस्वयंचलित दरवाजे यातून अधिक पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. शंभर टक्के धरण भरल्याने वेळवंडी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर धरणे भरली. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचना पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिल्या आहेत.
निरा देवघर धरणाची पाण्याची साठवण क्षमता १२ टीएमसी असून, सध्या धरणात ९४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पूर्व पट्टयातील बारामती, फलटण, सोलापूर, इंदापूर या भागांतील पाणी प्रश्न मिटला आहे.
धरण भरल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबले, सहायक अभियंता योगेश भंडवलकर, सहायक अभियंता शरद किवडे, शाखाधिकारी गणेश टेमले यांनी धरणांची पाहणी केली. कोणीही नदीपात्रात उतरू नये, बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षितस्थळी हलवावे, नदीपात्रातील शेतीपंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावेत, अशा सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.
चार धरणांमधील पाणीसाठा...
■ भाटघर
उपयुक्त पाणीसाठा २३.५०२ टीएमसी एकूण टक्केवारी १०० टक्के.
■ नीरा देवघर
उपयुक्त पाणीसाठा ११:१२६ टीएमसी एकूण टक्केवारी ९४.८६ टक्के.
■ वीर धरण
उपयुक्त पाणीसाठा ८.९६८ टीएमसी एकूण टक्केवारी ९५.३२ टक्के.
■ गुंजवणी धरण
■ उपयुक्त पाणीसाठा ३:२५९ टीएमसी एकूण टक्केवारी ८८.३३ टक्के.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाणीसाठा
गतवर्षी ३ ऑगस्ट २०२३ रोजी या चार धरणांतील एकूण पाणीसाठा ३८.४३९ टीएमसी व टक्केवारीत ७९.५४ टक्के एवढा होता तर आज ३ ऑगस्ट २०२४ रोजी याच चार धरणांतील एकूण पाणीसाठा ४६.७१५ टीएमसी व ९६.६६ टक्के एवढा आहे. वीर धरणातून निरा नदी पात्रात सकाळी ६ वाजता ४२९८३ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी १२९९ तर डाव्या कालव्यासाठी ६५० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.