नीरा यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी शेवटच्या आठवड्यात वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गेली आठवडाभरापासून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
बुधवारी रात्री आठ वाजता भाटघर धरणातून १ हजार ७५० क्युसेकने, नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेकने गुंजवणी धरणातून २५० क्युसेकने तर वीर धरणातून १५ हजार १६१ क्युसेकने विसर्ग सुरू होता. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता चारही धरणे ९३.८९ भरल्याने नीरा खोऱ्यातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
मागील आठवड्यात गुरुवारी नीरा नदीवरील वीर धरण ९७ टक्के भरल्याने ६१ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. गुरुवारी (दि.२५) रात्री व शुक्रवारी नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंती घेतली व विसर्ग ५ हजार ९९७ क्युसेकने करण्यात आला.
तर काल गुरवारी पहाटे पावसाची संततधार सुरू असल्याने सायंकाळी ५ वाजता वीर धरणातून ५ हजार ८८७ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. ४८.३२९ टीएमसी क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चार धरणात गुरुवारी सकाळी ४५.३७८ टीएमसी म्हणजे ९३.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे.
गुरुवारी (दि.१) सायंकाळी नीरा खोऱ्यातील भाटघर धरण ९५.८८ टक्के, नीरा देवघर ९२.३६ टक्के, गुंजवणी ८३.३९ टक्के तर वीर धरण ९४.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून भाटघर व नीरा देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता भाटघर धरणातून १ हजार ६६७ क्यूसेकने, नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेकने, गुंजवणी धरणातून २५० तर वीर धरणातून ५ हजार ८८७ क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. वीर धरणावरील नीरा डाव्या कालव्यातून ६५० क्युसेकने तर नीरा उजव्या कालव्यातून १ हजर १०१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
आठवड्याभरात वीर धरणातून १०.५ टीएमसीपाण्याचा विसर्ग मागील वर्षी २०२३ साली पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे चारही धरणे ऑगस्ट महिन्यातही भरली नव्हती. त्या आधीच्या वर्षी २०२२ साली पावसाने हाहाकार माजवला होते. त्यावर्षी जूनपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत वीर धरणातून विसर्ग सुरू होता.
या वर्षी वीर धरणातून मागील आठवड्यात गुरवारी सकाळपासून विसर्ग सुरू झाला होता. तेंव्हापासून कमी जास्त प्रमाणात दररोज वीर धरणातून विसर्ग सुरू आहे. गेली आठवडाभरात ९.५० टीएमसी क्षमता असलेल्या वीर धरणातून तब्बल १०.५० टीएमसी पाणीसाठा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी थेट कर्नाटकातील अलमट्टी धरणात गेले आहे.