Join us

भेंडवळच्या घटमांडणीत यंदा पावसाबद्दल आलं असं भाकित? शेतकऱ्यांच्या काळजीचं की फायद्याचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 9:53 AM

भेंडवळच्या घटमांडणीत आज ११ मे रोजी सकाळी यंदाच्या पाऊसपाण्याचा व पिकाचा अंदाज वर्तविण्यात आला. जाणून घेऊ कसा असेल पाऊस

हवामान खात्याने पावसाचा कितीही अंदाज वर्तविला, तरी आजही अनेक शेतकऱ्यांचा पारंपरिक पद्धतीने भाकीत होणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीवर विश्वास असतो. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी होते आणि आज सकाळी अंदाज वर्तविला जातो.

असा आहे पाऊस-पिकाचा अंदाजआज सकाळी भेंडवळ येथील भाकितात यंदा बरा पाऊस असेल. पहिल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये कमी पाऊस असेल. दुसऱ्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये सर्वसाधारण, तर तिसऱ्या महिन्यात ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडेल. चौथ्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये अवकाळीसह बरे पाऊसमान असेल.

यंदा तुरीचे अनिश्चित उत्पादन, ज्वारी सर्वसाधारण, मुग-उडीद सर्वसाधारण, बाजारी सर्वसाधारण, तर तीळ पीक चांगले असेल, तसेच पिकांवर रोगराई असेल. साळीचे अर्थात भाताचे पिक चांगले असेल असाही अंदाज भेंडवळच्या या घटमांडणीत केला आहे.

सुमारे ३५० वर्षांची परंपरा येत्या काळातील पाऊस, पीक, नैसर्गिक आपत्ती तसेच राजकीय स्थितीचा अंदाज वर्तवणारी भेंडवड येथील घटमांडणी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये भेंडवड या गावी १० मे रोजी परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. या भाकितासाठी राज्यभरातून शेतकरी व व्यापारी येत असतात. या भाकीताला सुमारे ३५० वर्षांची परंपरा आहे.

अशी झाली मांडणी काल अक्षय्य तृतीयेला चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत त्यांचे वंशज पुंजाजी महाराज तथा त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी सूर्यास्ताच्या वेळी ही घटमांडणी केली. गावालगत असलेल्या शेतामध्ये ही मांडणी करण्यात आली. 

यावेळी मातीचा एक भला मोठा घट तयार करण्यात आला. त्यामध्ये अंबाडी, गहू, ज्वारी, तूर, उडिद, मूग, कपाशी, करडई, हरभरा, जवस, भादली, तांदूळ, वाटाणा, मसूर, बाजरी इत्यादी १८ प्रकारची धान्य ठेवण्यात आली. 

त्याचबरोबर गटाच्या मधोमध एक खड्डा खोदण्यात आला. त्यामध्ये चार ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात आली. घागरीवर पुरी, सांडोळी, कुरडई, पापड, भजी, वडे आदी खाद्यपदार्थ ठेवण्यात आले. 

अशाप्रकारे घटमांडणी केल्यानंतर पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज त्यांच्या अनुयायासह परतले. रात्रीच्या वेळी या शेतात कुणीही फिरकत नाही. त्यामुळे रात्रीदरम्यान या घटांमध्ये जे काही बदल घडतात. 

त्यावरून आज ११ मे रोजी पहाटे ६ वाजता यंदाच्या पीक पाण्याविषयीचा अंदाज जाहीर केला गेला.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजमोसमी पाऊसशेतीपाऊस