गुलाबी थंडीची नवलाई नुकतीच कुठे सुरू झाली असताना 'नभ मेघांनी आक्रमिले' आणि अग्गोबाई.. गुलाबी थंडीचं काय घेऊन बसलात साधी थंडीपण गायब झाली की हो!
गारठलेल्या विदर्भाचा पारा उसळला, काकडा भरलेला खानदेश उसासे टाकू लागला, मुंबईकरांचा नेहमीप्रमाणे घामटा निघाला, एवढंच कशाला काही मुलखात पावसाचा शिडकावा पण झाला. एवढा सगळा बदल 'फेंगल'मुळे झाला.
Fengal Cyclone 'फेंगल' बंगालच्या उपसागरात जे चक्रीवादळ तयार झाले त्याचेच हे नाव. हे फेंगल तीन दिवसांपूर्वी पुदुचेरी (तामिळनाडू) किनारपट्टीवर येऊन धडकले.
त्यामुळे तामिळनाडूसह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील काही भागात मुसळधाराही बरसल्या. त्याच ढगांची दाटी आता राज्यात झाली असून त्याने गुलाबी थंडीला पळवून लावले आहे.
विदर्भात ३ अंशांनी वाढ
- विदर्भात गेल्या चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने थंडीला पार दूर केले आहे.
- रात्रीच्या तापमानात मंगळवारी ३ अंशांनी वाढ झाली व पारा २१.४ अंशांवर पोहोचला, जो सरासरीपेक्षा तब्बल ७.८ अंशांनी अधिक आहे.
- नागपूरकरांच्या अंगावरचे स्वेटर दूर झाले आहे. दिवसा पारा सरासरीत असल्याने थोड्या प्रमाणात गाख्याची जाणीव होत आहे.
- चंद्रपूरचा पारा सर्वात कमी १७ अंशांवर आहे. गोंदिया, वर्धा, बुलढाणा, वाशिम २० अंशांच्यावर आणि अमरावती, भंडारा १९ अंशांवर आहेत.
हवामान विभागाचा असा आहे अंदाज
बुधवारी
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागांमध्ये विजांसह पाऊस तर रत्नागिरी, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या सरीची शक्यता.
गुरुवारी
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट'. रायगड, नगर, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या सरीची शक्यता.
शुक्रवारी
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये काही भागात 'यलो अलर्ट. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम पावसाचा अंदाज.
डिसेंबर महिन्यात देशाचा वायव्य भाग, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता कमी आहे. देशाच्या दक्षिणेकडील काही भाग, मध्य भारताचा काही भाग, पश्चिम मध्य भारत आणि पूर्व मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. देशात दक्षिणेकडील काही भाग वगळता कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. - कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख. हवामान विभाग, पुणे