निफाड तालुक्यात रविवारी दुपारी अडीचच्या दरम्यान वादळी वारा आणि गारांच्या पावसाने द्राक्ष, कांदा, उसासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसाने द्राक्ष पंढरी हादरली असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने निफाड परिसरात विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, सायंकाळी पुन्हा निफाड, जळगाव, शिवरे, काथरगाव, कुरुडगाव, उगाव, शिवडी परिसराला गारांनी अक्षरशः झोडपून काढले. गारांचा वेग इतका होता की, त्या तडाख्यात सर्वच पिकांची पाने गळून पडली. रस्त्यावर गारांचा खच पडला होता. त्यामुळे फुलोरा अवस्थेतील बागांचे नुकसान झाले.
अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे निफाड तालुक्यात द्राक्ष बागांसह पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याबाबत प्रशासनाशी त्वरित संपर्क साधला आहे. शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावे.
- बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव बाजार समिती
पाऊस आणि गारांमुळे द्राक्षबागांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. काही बागांचे गारपिटीने पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे. फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागा तसेच खेडलेझुंगेला वीजपुरवठा थिनिंग झालेल्या व थिनिंगच्या स्टेजमधील बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
- रामनाथ शिंदे, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ
दिंडोरीत भात, टोमॅटो भाजीपाल्याचे नुकसान
दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागात ऐन फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागा तर पश्चिम भागात काढणीला आलेल्या भात पिकासह विविध भाजीपाल्याचे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अतोनात नुकसान केले आहे. दुष्काळी स्थितीमुळे चिंतेत असलेला बळीराजा त्यामुळे हवालदिल झाला आहे. पंचनामे करत पीक विमा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी केली आहे.
गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी हलकासा शिडकावा होत पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र सायंकाळी वारा व विजेच्या कडकडाटासह शहरासह मोहाडी खडक सुकेने, पालखेड, खेडगाव, लोखंडे वाडी, जोपुळ, जानोरी, कादवा कारखाना लखमापूर वणी, निगडोळ, पाडे, रासेगाव, ढकांबे आदी भागात पाऊस झाला.
तिसगाव परिसरात काही ठिकाणी गाराही झाल्या. पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली. पावसाने द्राक्ष मनी गळ होत नुकसान झाले आहे. टोमॅटो पिकासह कारले, भोपळे, मिरची आदी भाजीपाल्याचे नुकसान झाले. पुढील दोन तीन दिवसात नुकसानीची तीव्रता दिसणार आहे. ऊस तोडणी कामगारांचे पावसाने मोठे हाल झाले. गळीत विस्कळीत होण्याची शक्यता आहे.