Buldhana Rain Alert :
बुलढाणा :
जिल्ह्यात परतीचा पाऊस सक्रीय झाला असून २९ सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तीन मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये तुळजापूर, सिंदखेड राजा आणि जनुना मंडळाचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात पावसादरम्यान वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दोन गुरे दगावल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थान आणि गुजरातमधून पाऊस माघारी फिरला असून बुलढाणा जिल्ह्यातून पाऊस साधारणतः २० ऑक्टोबरनंतर जाईल, असे जुन्या नोंदीच्या आधारे म्हणता येते. त्यामुळे ऑक्टोबरमध्येही जिल्ह्यात परतीचा पाऊस रहाण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यात वार्षिक ७६१.६ मिमी पाऊस पडतो. २५ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ७५२.२ मिमी पाऊस पडला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो ९८.७६ टक्के जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक असून येथे यंदा तब्बल १ हजार १७ मिमी एवढा विक्रमी नोंद झाली आहे.
पाच तालुक्यांनी यापूर्वीच पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दरम्यान बुलढाणा, चिखली आणि नांदुरा तालुकाही येत्या काळात पावसाची सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.
या मंडळात जोरदार बरसलादेऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापरू मंडळात (६७.५ मिमी), सिंदखेड राजा तालुक्यात सि. राजा मंडळात (६७.५) आणि खामगाव तालुक्यातील जनुना मंडळात ९३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस जिल्ह्यात आगमन करतांना मेघ गर्जनेसह विजांच्या गडगडात येतो. याच प्रमाणे परतीदरम्यानही हा पाऊस विजांच्या गडगडाटात परत जातो.
या कालावधीत जिल्ह्यात विजा पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा
बुलढाणा जिल्ह्याला नागपूर हवामान विभागाने बुलढाणा जिल्ह्यात २९ सप्टेंबर पर्यंत येलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पाऊस, विजा चमकत असतांना बाहेर जाणे टाळावे, विजांपासून संरक्षणा करीता दामिनी ॲपचा वापर करावा, झाडांपासून दूर राहावे, दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
शक्य असल्यास ज्या धान्यांची कापनी झालेली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी हालवावे. पाऊस, वादळ सुरु असतांना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते. तरी त्यापासून दूर रहावे. दरम्यान या कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.