Join us

या शतकाअखेरीस हिमनद्या नष्ट होण्याचा धोका टळेल! शास्त्रज्ञांचा निष्कर्ष काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 6:40 PM

हिमनद्यांमुळे नद्यांना मुबलक पाणी...

कोरोना साथीच्या काळात जितके वायू प्रदूषण कमी झाले होते ती पातळी कायम राखण्यात यश आल्यास हिमालय पर्वतातील हिमनद्यांचे (ग्लेशियर) रक्षण करणे शक्य होईल, तसेच या शतकाअखेरीस या हिमनद्या नष्ट होण्याचा धोका टाळता येईल. भारत, जर्मनी व ब्रिटनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

देशभरात सध्या प्रदुषण पातळीत वाढ झाल्याचे अहवाल प्रसिद्ध होत असताना, तसेच वाढत्या पाण्याचं संकट समोर उभे ठाकले असताना हा अभ्यास महत्वाचा मानला जात आहे. भारतातील हिमनद्यांमधील दुषीत पाणी आणि कमी  हाेत जाणारे बर्फाचे आवरण यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची मोठी समस्या येणार असल्याचे पर्यावरण तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

२०२० साली कोरोनाच्या साथीमुळे वाहतुकीपासून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले. परिणामी वायू प्रदूषणाचे प्रमाण इतके कमी झाले की, त्यामुळे या हिमनद्या दररोज वितळण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा ०.५ ते १.५ मिलिमीटरने कमी झाले होते. मात्र, कोरोनाकाळातील निबंधानंतर दूर झाल्यानंतर पुन्हा वायू प्रदूषणात वाढ झाली. हिमनद्या वितळण्याची होत असलेली प्रक्रिया आणि बर्फाचे आवरण कमी झाल्यामुळे आशियातील अब्जावधी लोकांच्या शाश्वत पाणी पुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे.

गंगा, यांगत्से यासारख्या नद्यांच्या खोऱ्यात राहाणाऱ्या लोकांपुढे भविष्यात पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना साथीच्या काळामध्ये प्रदूषणाची घटलेली पातळी जर कायम राखता आली तर हिमनद्यांमधील बर्फ वितळण्याचे प्रमाण निम्म्यावर येऊ शकते असे भारत, ब्रिटन, जर्मनी या देशांच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात आढळून आले. त्यावर आधारित लेख ॲटमॉस्फेरिक केमिस्ट्री अँड फिजिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

स्वच्छ ऊर्जेचा पुरवठा व कमी वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांमुळे वातावरणात खूप फरक पडतो. त्यामुळे हिमालयातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी होण्याचा धोका टाळता येईल, असे या अभ्यासातील निष्कर्षांत म्हटले आहे. 

हिमनद्यांमुळे नद्यांना मुबलक पाणी

पृथ्वीवरील ध्रुवीय प्रदेशांनंतर सर्वाधिक बर्फाचे थर हिंदुकुश पर्वत व मध्य आशियातील तिबेट येथील पर्वत शिखरांवर आढळून येतात. तेथील हिमनद्या वितळून त्यामुळे भारत व चीनमधील नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध होते. ते ते पाणी वीजनिर्मिती व शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थांना भक्कम आधार मिळतो.

टॅग्स :नदीप्रदूषणसंशोधनपाणी