मंगळवार दि.१३ फेब्रुवारी पासून महाराष्ट्रातून कायमची थंडी गायब होण्याची शक्यता असतांना, सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमानाची आणि भले अल्पसी व चढ-उतारासहित का होईना पण शेतपिके व फळबागांना लाभदायक ठरु पाहणारी, फेब्रुवारीअखेर पर्यंतची हिवाळ्यातील थंडी आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करणार की काय, असे वाटू लागले आहे.
कश्यामुळे हे घडते आहे?
- उत्तर भारतात एकापाठोपाठ कमी दिवसांच्या अंतराने मार्गक्रमण करणाऱ्या तीव्र पश्चिम झंजावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे हे घडत आहे. उत्तर भारतात त्यामुळे धुक्याचे प्रमाणही आता कमी होवून दृश्यमानताही तेथे सुधारली आहे.
- संपूर्ण उत्तर भारतात आजपासून पुढील ५ दिवस म्हणजे २२ फेब्रुवारीपर्यंत पश्चिमी झंजावात व त्याचबरोबर मध्य-भारत स्थित 'प्रत्यावर्ती वारा पॅटर्न'च्या बदलातून तेथे पुन्हा जोरदार पाऊस, जबरदस्त बर्फबारी व गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे.
- तसेच संपूर्ण उत्तर भारत ते महाराष्ट्रातील खांदेशातील अक्षवृत्तपर्यंत, समुद्रसपाटी पासून साडेबारा किमी. उंचीवर, पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २७० किमी अतिवेगवान प्रवाही झोताचे 'पश्चिमी' वाऱ्यांचे वहन अजुनही टिकून आहे.
- कर्नाटक किनारपट्टी ते खान्देश पर्यन्त समुद्रसपाटी पासून साधारण १ किमी. उंचीपर्यंत पसरलेला हवेचा कमी दाबाचा आस
ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा खंडीत का होईना पण स्रोत टिकून आहे. त्यामुळे महाराष्ट्रात, त्यामुळे मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सोलापूर पर्यंतच्या ७+१०=१७ जिल्ह्यात उत्तरेकडून घुसणाऱ्या थंड वाऱ्यांच्या शक्यतेमुळे, पहाटेच्या किमान तापमानात घट होवून, दि. २१ ते २३ फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या ३ दिवसात पुन्हा ह्या वरील १७ जिल्ह्यात मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे.
मराठवाडा व विदर्भात मात्र, दरम्यानच्या काळात, पहाटेचे किमान तापमान, सरासरीइतकेच राहून, तेथे त्या प्रमाणातच थंडी जाणवेल.
त्याचबरोबर वरील वातावरणीय परिणामातून जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मधील पर्यटन पुढील ५ दिवस म्हणजे २२ फेब्रुवारी पर्यंत, गैरसोयीचे व त्रासदायक ठरु शकते, ह्याचीही नोंद पर्यटकांनी घ्यावी असे वाटते.
- माणिकराव खुळे, Meteorologist (Retd) IMD Pune