Join us

उत्तर महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता, पुढील ३-४ दिवस राज्यात पावसाचा तीव्र इशारा

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 25, 2023 5:00 PM

कोणत्या जिल्ह्यात कोणता इशारा, जाणून घ्या...

राज्यात पुढील ३-४ दिवसात काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा तीव्र इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्रात रविवारी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

उद्या (दि.२६) बहुतांश राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हानिहाय कुठे काय असेल स्थिती?

अवकाळी पावसासह गारपीटही...

राज्यात रविवारी (२६) कोकण, दक्षिण,मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यसह विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील ३ ते चार दिवसही हलक्या ते मध्यम सरींचा अवकाळी पाऊस राज्यभर हजेरी लावणार असल्याची शक्य ता आहे.

अंदमान समुद्र आणि आजूबाजूच्या परिसरात नर्माण झालेल्या चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी राज्यात बहूतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४५ ते ५५ किमी प्रतितास राहणार आहे.

कुठे होणार पाऊस?

राज्यात आजपासून २८ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज २५ नोव्हेंबर रोजी  ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात कोणत्या भागात कधी अवकाळी पाऊस? 

यासह विदर्भात अकोला, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गारपीट कशामुळे?

पश्चिमेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेतून येणाऱ्या उष्ण व बाष्पयुक्त वारे एकत्र आल्याने गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे. रविवार व सोमवार म्हणजेच 26 आणि 27 नोव्हेंबरला नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक आहे.

शेतकऱ्यांपुढं नवं संकट! महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळीसोबत गारपिटीची शक्यता

तसेच या भागात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करूनवरील पश्चिमी झंजावात प्रणालीत होणाऱ्या विलीनिकरणामुळे दोन प्रणाल्यांच्या संयोगातून गारपीटीची शक्यता वाढली आहे. 

 

टॅग्स :पाऊसहवामानशेतकरी