राज्यात काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आज दिनांक ३१ जुलै २३ ते पुढील पाच दिवस अनेक मध्य महाराष्ट्र, कोकण व गोवा येथील घाटमाध्याच्या परिसरात निवडक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर ३ ऑगस्ट रोजी मुंबईसह कोकण व घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.
दिनांक १ आणि २ ऑगस्ट रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. ३ व ४ ऑगस्ट रोजी या परिसरात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्याचे पाऊसमान
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक ३१ जूलै रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तर १ ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक १ ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक ३ ऑगस्ट २३ पर्यंत पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त व दिनांक ४ ते १० ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा दर कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
पेरणीसाठी सल्ला
पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (७५ ते १०० मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक २ ते ८ ऑगस्ट २३ दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.