गेली दीड महिना चातकाप्रमाणे प्रतीक्षेत असलेला पाऊस मंगळवार (दि. ७) पासून कोल्हापूर जिल्ह्यात बरसणार आहे. दोन दिवस वातावरणात बदल झाला असून, दिवसभर आकाश ढगाळ राहिले आहे. हा पाऊस रब्बी पेरणीसह ऊस पिकाला पोषक ठरणार आहे. यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरवली आहे. अखंड पावसाळ्यात जेमतेम ३० दिवसच पाऊस झाला असेल, ऑक्टोबर महिना कोरडा गेल्याने जमिनीतील पाणी पातळी घसरली आहे. ऑक्टोबर हिट आणि जमिनीत पाणी नसल्याने पिकांना कितीही पाणी दिले तरी भूक संपत नाही.
आता ही परिस्थिती तर जानेवारी नंतर काय? या चिंतेत शेतकरी आहे. त्यामुळे किमान दीपावलीत पाऊस होईल, या आशेने शेतकरी बसला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारपासून जोरदार पाऊस कोसळणार आहे. किमान चार दिवस म्हणजेच शुक्रवार (दि. १०) पर्यंत पाऊस राहील असा अंदाज आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांतही जोरदार पाऊस होणार आहे.