देशभरात नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेण्यास विलंब होत असताना राज्यात पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अंदमान समुद्र व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या मध्य व दक्षिण भागात जोरदार पाऊस पडेल. दरम्यान राज्यातही पुढील चार दिवस पावसाची हजेरी असणार आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व गुजरात मधील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 17 सप्टेंबर या अपेक्षित मान्सून माघारीच्या तारखेनंतर दहा दिवसांनी नैऋत्य मान्सून राजस्थान सह देशाच्या वायव्य व पश्चिम मध्य भागातून माघार घेत आहे.
आज गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा व अकोला जिल्हे वगळता उर्वरित राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहणार आहे.
मराठवाडयात दिनांक 28 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.