राज्यात एकीकडे तापमानात कमालीची वाढ होत असताना भारतीय हवामान विभागाने देशासह राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील लातूर, बीड,धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 30 मार्च रोजी या तीन जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुढील चार दिवसात कमाल तापमानात वाढ होऊन रात्रीच्या वेळी उष्णता जाणवेल व त्यानंतर कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात पुढील तीन दिवसात कमाल तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 29 मार्च ते 04 एप्रिल दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.