Join us

मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनो पिकांना आणि पशुधनाला जपा

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 11, 2023 5:30 PM

राज्यात पुढील १० दिवस पाऊस दडी मारण्याची चिन्हे हवामान विभागाने वर्तवलेली असताना मराठवाड्यातही पुढील पाच दिवस हलका पाऊस होण्याची ...

राज्यात पुढील १० दिवस पाऊस दडी मारण्याची चिन्हे हवामान विभागाने वर्तवलेली असताना मराठवाड्यातही पुढील पाच दिवस हलका पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून  11 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व दिनांक 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी  विद्यापीठ,परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पीक व्यवस्थापन कसे करावे याविषयी काही शिफारसी दिल्या आहेत. यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उशिरा केल्या. 

जमिनीचा ओलावा कसा टिकवून ठेवाल?

उशिरा पेरण्या केल्या असतील तर जमिनीचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही उपाय करणे आवश्यक आहे.

  1.    सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांनी  हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
  2.  नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
  3.  भाजीपाला पिकात तसेच चारा पिकांना हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. 

पशुधनाची 'अशी' घ्या काळजी

गोवंशीय पशूंना होणाऱ्या त्वचारोगांचा प्रसार किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू प्रसारीत करतात.हिमॅटोबीया ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते. यासाठी काय करावे?

  •  शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व शेणाचा  खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे. 
  •  पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे. 
  • टॅबॅनस ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते.  
  • पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व गोठयात ठेवावे. स्टोमोक्सीस या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती आपली अंडी घालतात. 
  • गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी. 
  • या माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा सोडून पशुधनास चरावयास सोडावे.
टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजमराठवाडाशेतकरीपाऊसपाणीपीक व्यवस्थापनपीकपेरणीखते