मुंबईचे किमान तापमान मंगळवारी २० अंश नोंदविण्यात आले आहे. बुधवारीही मुंबापुरीच्या किमान तापमानाचा पारा २० अंशाच्या आसपास राहील.
त्यामुळे मुंबईकरांना आजही थंडीचा आनंद लुटता येणार असून, गुरुवार ते रविवारी दरम्यान मुंबईच्या तापमानात वाढ होईल.
पुन्हा सोमवारनंतर किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. २० नोव्हेंबरनंतर मुंबईकरांना थंडीचा पुरेपूर आनंद घेता येणार आहे.
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आली.
राज्यात काही ठिकाणी किमान तापमानाचा खाली घसरण्यास सुरुवात झाली आहे. यात अहमदनगर, जळगाव, महाबळेश्वर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबई महानगर प्रदेशात पुढील काही दिवस हवामान किंचित ढगाळ नोंदविण्यात येईल. पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात काही ठिकाणी किंचित पाऊस पडेल. २० नोव्हेंबरनंतर मुंबईतल्या किमान तापमानात चांगली घट होईल आणि मुंबईकरांना थंडीचा आनंद लुटता येईल. - अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक