येत्या चार आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीसह दक्षिण द्वीकल्प, मध्य भारतातील काही भागात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाचे पुनर्जीवन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभाग पुण्याचे शास्त्रज्ञ व अभ्यासक के.एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विटही केले आहे.
राज्याच्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली आहेत. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रसह मध्य भारतातही पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून कर्नाटक आणि केरळ राज्यांनाही पावसाचा अंदाज आहे.
पाऊस होणार मात्र सरासरीपेक्षा कमीच!
ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच राज्यात सरासरीहून कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने आज वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असेल. मात्र, पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज वर्तवला आहे.
सप्टेंबर महिन्यात देशातील बहुतांश भागात कमाल तापमान हे अधिक होण्याची शक्यता आहे. तसेच देशात सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस होण्याची शक्यता असून साधारण 167.9 मीमी एवढा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.