Join us

मराठवाड्यात आज बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी कसे करावे पीक व्यवस्थापन?

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 25, 2023 5:07 PM

मराठवाड्यात आज उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात अनेक जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत असताना अजूनही मराठवाड्यात हवा तसा पाऊस झाला नसल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मराठवाड्यात आज उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 25 ‍व 26 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 27 व 28 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 29 ते 31 जुलै दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात  30 जूलै ते 05 ऑगस्ट दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. २६ व २७ जुलै २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात तर दि. २८ ते ३० जुलै २०२३ तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

 - शास्त्रज्ञ प्रा. अशोक निर्वळ, औरंगाबाद जिल्हा कृषि हवामान केंद्र 

यामध्ये दि. २५ व २६ जुलै २०२३ करीता सतर्कतेचा इशारा म्हणून तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पाच दिवसात कमाल तापमान २८.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६० ते ८६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २४ ते २९ किमी/तास राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी काही कृषि हवामान आधारीत शिफारशी केल्या आहेत. यामध्ये पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी खत देणे किंवा फवारणी करणे टाळाण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. 

पीक व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील कापूस, तूर, मुग/उडीद, भुईमूग व मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

भाजीपाला

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागात भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात  अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पावसाचे वाहत येणारे पाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळू देऊ नये. जनावरांना पिण्यास शुध्द व स्वच्द पाणी द्यावे. पावसामूळे चरण्यासाठी गवत सर्वत्र उपलब्ध होत आहे. गवत प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व मेंढीमध्ये याचे प्रमाण  25 मिली + 100 मिली एवढे असावे.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयामध्ये पाणी दूषि‍त झालेले असते. अशा पाण्याचा वापर केल्याने, अतिसार, उलटया, गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामूळे असे घातक आजार टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्यात तूरटी फिरवून पाणी उकळून, गाळून आणि थंड करून त्याचा वापर करावा.

इतर 

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजशेतकरीपीक व्यवस्थापनपीकमोसमी पाऊसशेतीपाऊसपेरणीखतेविज्ञानमराठवाडा