दक्षिण आरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण व गोव्यात पुढील चार दिवस हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
एकीकडे उत्तरेकडील राज्ये थंडीने गारठली असताना दक्षिणेत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ५ ते ११ जानेवारी दरम्यान राज्यात काही भागात पावसाची हजेरी लागणार असून तापमानात घटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशात कुठे पाऊस कुठे बर्फवृष्टी?
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राजस्थान, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर उर्वरित देशात हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे. उत्तरेतील हिमाचल प्रदेशच्या मैदानी प्रदेशात तसेच काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होणार असल्याचेही सांगण्यात आले.
मराठवाड्यात पुढील पाच दिवस ढगाळ
मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ राहून दिनांक 05 व 06 जानेवारी, 2024 रोजी आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.