अरबी समुद्राच्या दक्षिण भागावर घोंगावणाऱ्या चक्रीय वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने २ डिसेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. वादळी वाऱ्यसह वीजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. पुढील २४ तासांत तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे २ ते ४ डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काल विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. कोकणात आता पाऊस थांबला आहे. विदर्भ खान्देशात पावसाचा जोर काल रात्री कायम होता. ५ डिसेंबर पर्यंत विदर्भ, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात अजून दोन दिवस हलका पाऊस पडेल.
दरम्यान, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ घोंगावत आहे. अनेक दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील देान दिवसात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्यांचा परिणाम होणार आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता राहणार आहे. देशाच्या उत्तर भागातही पावसाची हजेरी राहणार आहे. तर मैदानी सपाट प्रदेशात तापमानात घसरण होणार आहे.
यलो अलर्ट कुठे?
आज नाशिकसह धूळे, नंदूरबार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, बुलढाणा, अकोला, वाशिम,यवतमाळ, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आले आहे. नगर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.