Join us

विदर्भ- मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, काय आहे राज्याचा अंदाज?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 4:11 PM

एकीकडे तापमान तीशीपार जात असताना विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, काय आहे कारण?

राज्यात उकाडा आणि तापमानाने तीशी पार केलेली असताना पुन्हा ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. काय आहे नक्की अंदाज?

विदर्भ व मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली अश्या १५ जिल्ह्यात, दि.२५ ते २७ फेब्रुवारी (रविवार ते मंगळवार) पर्यंतच्या ३ दिवसात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. महाराष्ट्रातील उर्वरित २१ जिल्ह्यात ही शक्यता जाणवत नाही. 

कुठे पडणार थंडी?

महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ९ जिल्ह्यात उत्तरेकडून घुसणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दि.२१ ते २३ फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या ३ दिवसात पहाटेच्या किमान तापमान १४ तर कमाल ३०ते ३२ डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे.  ही तापमाने जवळपास सरासरी इतके किंवा त्याखाली जाणवत आहे. महाराष्ट्रातील उर्वरित २७ जिल्ह्यात ही तापमाने काहीशी अधिक असुन ती १७ व ३४ डिग्री से. ग्रे. दरम्यान जाणवत आहे. 

पावसाची शक्यता कशामुळे?

फेब्रुवारीअखेर सध्याच्या हिवाळी हंगाम संपून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरु होण्याचा संक्रमणाचा हा काळ असतो. साधारणपणे पूर्वमोसमी हंगामात पूर्व म. प्र. ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली दिसू लागतात. ह्या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटीसह वीजा, गारांचा पाऊस कोसळत असतो.

सध्या अशीच हवेच्या कमी दाबाचा आस सहित वारा खंडितता प्रणाली असुन बं. उ. सागरातील उच्चं हवेच्या दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यातून आसाच्या पूर्वेला दक्षिणेकडून तर पश्चिमेला उत्तेकडून एक किमी. उंचीपर्यंत वारे वाहत आहेत. त्यामुळे फक्त विदर्भ मराठवाड्यातील १५ जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 

माणिकराव खुळेMeteorologist (Retd.)IMD Pune.

टॅग्स :पाऊसहवामानतापमानमराठवाडाविदर्भ