राज्यात विविध ठिकाणी सध्या अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
मध्य अफगाणिस्तान व आजूबाजूच्या परिसरात सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स असून अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
आज मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे.