देशात जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीत देशात ९६ ते १०४ टक्के श्रेणीत पडणारा पाऊस हा जरी सरासरी इतका पाऊस मानला जात असतो. मात्र भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या अंदाजानुसार या वर्षी देशात येत्या पावसाळ्यात गुणात्मकदृष्ट्या (क्वान्टीटेटिवली) १०६ टक्के अधिक ५ टक्के पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे नकारात्मक शक्यतेच्या अंकानुसार ही शक्यता (१०६-५) म्हणजे तरीदेखील १०१ टक्के येते, कि जी सरासरीइतक्या (९६ ते १०४ टक्के) पावसाच्या श्रेणीत मोडते. म्हणून देशात जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीत सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचीच शक्यता अधिक जाणवत, असल्याचा अंदाज जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी २०२४ च्या पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च एप्रिल व मे २०२४ पर्यन्त 'एल -निनो' कमकुवत होण्याची शक्यता असून २०२४ च्या मॉन्सूनच्या पहिल्या दोन महिन्यात म्हणजे जून, जुलै महिन्यात एन्सो तटस्थेत होण्याच्या शक्यता जाणवते. मान्सूनच्या उर्वरित दोन महिन्यात म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ‘ला-निना’ चा उदगम होण्याची शक्यता जाणवते. पावसाळ्याच्या जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीतील ऊत्तर्धात म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ‘ला-निना’ बरोबरच भारतीय महासागरात धन ' भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ' (पॉझिटीव्ह इंडियन ओशन डायपोल) विकसित होण्याची शक्यताही आहे.
शिवाय २०२४ च्या ह्या गेलेल्या जानेवारी ते मार्च तीन महिन्यात पृथ्वीच्या उत्तर-अर्ध गोलात तसेच यूरेशिया भागातील बर्फाळ देशात सरासरीपेक्षा कमी झालेली हिमवृष्टीमुळे म्हणजेच ह्या तिन्हीही अवस्था देशातील मान्सूनला अधिक पूरक असून देशाला सरासरीपेक्षा अधिक पाऊस देण्याची शक्यता जाणवत आहे. कारण पॉझिटिव्ह आयओडी हा सुद्धा भारत देशाचा ' ला-निना 'च समजला जातो, तसेच कमी हिमवृष्टी म्हणजे भारत देशात अधिक पाऊस पडण्यासाठी अनुकूलता मानली जाते. एकंदरीत देशात ह्या २०२४ च्या वर्षी ' ला -निना ' व आय.ओ.डी. व यूरेशियातील कमी हिमवृष्टीने ने पावसासाठी अनुकूलता दर्शवून सरासरी पेक्षा अधिक पाऊस होण्याच्या शक्यतेमुळे देशातील शेतकऱ्यांच्या आशा अधिकच पल्लवीत केल्या आहेत .
महाराष्ट्रासाठी काय?
महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. टरसाइल' श्रेणी प्रकारनुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पेक्षा अधिक पावसाचीच शक्यता असुन ही शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५% जाणवत आहे. मात्र ह्या सरासरी पेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेमुळे हा अधिक पावसाचे वितरण कसे होते? यावरच पडणारा पाऊस लाभदायी कि नुकसानदेही ह्याचे उत्तर येणारा काळच देईल, असे वाटते.
मान्सूनच्या आगमनासंबंधी..
सरासरी तारीख १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. अर्थात केरळात आगमन झाल्यानंतरच मुंबईतील त्याच्या आगमनाची तारखेचा अंदाज बांधता येतो. मॉन्सून आगमन कालावधीत खालील ६ वातावरणीय घटकांच्या निरीक्षणानुसार मान्सूनच्या आगमनाची स्थिति त्या त्या वेळेस सांगितली जाते. खरं तर मुंबईतल्या आगमनानंतरच तो उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येतो. हे जरी खरं असले तरी मान्सूनचे आगमन व ४ महिन्यात पडणारा मान्सून ह्या दोन स्वतंत्र गोष्टी असुन त्यांच्या भाकीतांचे निकषही स्वतंत्र आहेत.
i) वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान,
ii) दक्षिण भारतातील ४ राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन,
iii) दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दिर्घलहरी उष्णता ऊर्जा,
iv) मलेशिया थायलंड पश्चिम कि. पट्टीवर १ ते दिड किमी. दरम्यानचे वाहणारे वारे
v) वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब
vi) बंगालच्या उपसागरातील, बांगला देश, इंडो्नेशिया, दरम्यानचा, पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा
अश्या या ६ घटकांचे सतत निरीक्षणावरून हा मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो. ३१ मे च्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाजात मान्सून आगमना संबंधी सविस्तर खुलासा केला जातो. तेंव्हाच अंदाजे मुंबईमध्ये मान्सून कोणत्या तारखेला दाखल होईल, हे कळते.
आज व उद्या (१५-१६ एप्रिल ला) दोन दिवस
विदर्भ - मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर मुंबईसह रायगड ठाणे रत्नागिरी पालघर ह्या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचीही शक्यता जाणवते. त्याचबरोबर संपूर्ण कोकण व गोव्यात मात्र दिवसा चांगलीच दमटयुक्त उष्णतेची काहिली व रात्री उकाडा जाणवू शकतो.
लेखक : माणिकराव खुळे, जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ