Join us

Chandoli Bhukanp: चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 3:56 PM

चांदोली धरण परिसरात बुधवारी (दि.२४) पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

शिराळा : चांदोली धरण परिसरात बुधवारी (दि.२४) पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वारणावती येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची तीव्रता ३.० रिक्टर स्केल एवढी नोंदवली गेली. भूकंपामुळे कोणतीही वित्त वा जीवितहानी झाली नाही.

भूकंपाचा केंद्रबिंदू धरणाच्या पश्चिमेला ८ कि.मी.वर होता अशी माहिती चांदोली पाटबंधारे शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली. तीव्रता कमी असली तरी पहाटेच्या शांततेत हा धक्का जाणवला. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे मंगळवारी एक मीटरने उचलत विसर्ग सुरु करण्यात आला. दरवाज्यांतून २२०० क्यूसेक व दोन विद्युत जनित्रमधून १६०० क्यूसेक, असा एकूण ३८०० क्यूसेक नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

वारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने अजूनही कोकरूड-रेठरे बंधारा, मांगले-सावर्डे पूल, समतानगर पूल, येळापूर-वाकुर्डे पूल, कांदे मांगले, सावर्डे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. पाडळेवाडी-निगडी फाटा रस्त्यावरील ओक्याच्या पुलावरून पाणी आल्याने काहीवेळ वाहतूक बंद केली होती.

धरणाचे दरवाजे उघडल्यावर पाणीपातळीत वाढ होणार, यासाठी दक्षता म्हणून शित्तूर व सोंडोली पूल दोन तासांसाठी बंद ठेवला होता, चांदोली धरणात मंगळवारी सायंकाळी चार वाजता २९०९ टीएमसी एकूण तर २२.२१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण ८४.५९ टक्के भरले आहे. भणदूर सम्राट अशोकनगर दरम्यानचा फरशी पूल वाहून गेला आहे.

टॅग्स :भूकंपधरणशिराळापाणीपाऊस