वारणावती : चांदोली धरण क्षेत्रात दरवर्षी चार ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. आजअखेर धरण क्षेत्रात ३७४१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील वारणावती पर्जन्यमापण यंत्रावर झाली आहे.
योग्य नियोजन व पाण्याच्या कमीअधिक केलेल्या विसर्गामुळेच चांदोली धरण यावर्षी ही १०० टक्के भरले आहे.
सध्या धरणाची पाणी पातळी ६२६.९० मीटरवर पोहचली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले चांदोली धरण आज १०० टक्के भरले असून, धरणात सध्या ९७४.१८८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात क्षेत्रात ०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात ५५३ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.
सध्या धरणाच्या सांडव्यातून व साडव्यातून व पायथा वीजगृहातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून, वारणा धारणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा तसेच वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाईल.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस• पाथरपुंज - १२ (७६५३)• निवळे १२ (७६५३)• धनगरवाडा - ४ (३७६९)• चांदोली धरण - ४ (३७६९)
शिराळा, वाळवा व शाहुवाडी तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. यावर्षीही धरण शंभर टक्के भरल्यामुळे नागरिकांची शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे पाण्याचे काटकोरपणे नियोजन करून मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. - गोरख पाटील (शाखा अभियंता, वारणा पाटबंधारे, वारणावती)