वीर धरणाच्या वरच्या परिसरात चांगल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे वीर धरणातून चंद्रभागा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरीत पोहोचल्याने चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे.
वीर धरणाच्या परिसरात दमदार पाऊस पडला. धरणातून सोडण्यात आलेले पाणी चंद्रभागा नदीपात्रात पोहचले आहे. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे चंद्रभागा नदीतील पाणी पाहायला नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच जुन्या दगडी पुलावर देखील काही काळ पाणी आले होते. यामुळे चंद्रभागेच्या घाटावर व पुलावर जाण्यास प्रशासनाकडून सक्त मनाई करण्यात आली आहे.
यामुळे शहरातील नदीकाठचा परिसर प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, नगर अभियंता नेताजी पवार, पंढरपूर सर्कल अधिकारी विजय शिवशरण, तलाठी अमर पाटील यांनी पाहणी केली आहे. पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड, मुंढेवाडी या गावातील नदीवरील पुलावर पाण्याची पातळी गेली आहे. चंद्रभागा नदीच्या पंढरपुरातील जुन्या पुलावर व गोपाळपुरातील विष्णुपद मंदिराजवळील बंधारा पाण्याखाली गेला आहे.
यामुळे त्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले व पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी पाहणी केली आहे. त्यानंतर पंढरपूर येथील शेगाव दुमाला येथूनही जुना दगडी पूल बॅरिकेडिंग करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच अजनसोंड, मुंढेवाडी येथे बॅरिकेडिंग करून रोडवरील वाहतूक पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी बंद केली आहे.
जुन्या दगडी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीचे पाणी जास्त आहे. त्यामुळे पाण्यात बुडण्याचा धोका आहे. तरी कोणीही खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये, अशा सूचनांचे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. - डॉ. प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद.
नदीतील पाणी पातळी वाढली आहे. यामुळे भाविकांनी, नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. जुन्या दगडी पुलावरून देखील नागरिकांनी ये-जा करू नये. याबाबत नदीजवळील गावांनी सतर्क राहावे.- सचिन लंगुटे, तहसीलदार, पंढरपूर.