अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस बरसत असून, शुक्रवार, १७ मे रोजी प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने अकोल्यासाठी पावसाचा 'येलो अलर्ट' दिला आहे. या दोन दिवसांत ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.
गत एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असून, मे महिन्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. कमाल तापमान ४४.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, जिल्हा होरपळून निघाला आहे.
अशातच दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार, १५ मे रोजी जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला.
अकोल्याचे कमाल तापमान ४२.४
४४.५ अंशांवर गेलेले कमाल तापमान तुरळक प्रमाणात आकाशात ढगाळ वातावरण असल्याने गुरुवारी ४२.४ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. परंतु, वातावरणात प्रचंड उकाडा होता.
जिल्ह्यात पाऊस
दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाळ्याला आता २० दिवस शिल्लक आहेत. याअगोदरच अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा - मृगाचा कोल्हा, चित्राची म्हैस; शेतकऱ्यांना यंदा पावसाळ्यात कोणते नक्षत्र तारणार?