छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली असून जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . 21 व 23 सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस जिल्ह्यात आकाश ढगाळ राहणार असून सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. तर 23 ते 26 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस व किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. या काळात आर्द्रता ६० ते ९० % राहणार असून वाऱ्याचा वेग ७-१२ किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार जिल्ह्यात 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहणार असून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असेल.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषी हवामान केंद्राने तज्ञ समितीच्या शिफारशी वरून शेतकऱ्यांना कृषी सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांनी पिकाची कशी काळजी घ्यावी?
ऊस: वाढीची अवस्था
ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रिड ४० टक्के डब्ल्यू जी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
कापुस:पाते लागणे ते बोंड धरणे
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे कापुस पिकामध्ये पातेगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलिक ॲसिटीक ॲसिड (एनएए) २ ते २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस पिकातील डोमकळया दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात.
मका:कणसे वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करण्याऐवजी जैविक पध्दतीने किडव्यवस्थापन करण्याकरीता मेटारायझियम ऍनिसोपली ५० ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तुर:फांद्या लागणे अवस्था
मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे तुर पिकामध्ये मर व करपा (फायटोप्थोरा ब्लाईट) रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एलिएट पावडर २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची उघाड बघुन आळवणी करावी.तसेच तुर पिकाचे शेंडे खुडावे जेणेकरून जास्त फांद्या फुटण्यास मदत होईल.
सिताफळ:फळवाढीची अवस्था
मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे सीताफळ बागेत फळसड दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २० ग्रॅम + कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला:फुलधारणा ते फळधारणा
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे,मावा) किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत शेळ्यांमध्ये जुलाब/हगवण लागल्याचे दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे.