राज्यात तापमानाचा चटका असह्य होत असून शनिवारी छत्रपती संभाजी नगर मध्ये 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने नोंदविलेल्या तापमानाचा अंदाजानुसार 24 तासात तापमानात फारसा बदल जाणवणार नसून त्यानंतर हळूहळू दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बारा वाजण्याच्या आतच जिल्ह्यात तापमानाचा चटका जाणवत असून उन्हाच्या तीव्रतेने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मराठवाडी गमचे, स्टोल,रुमाल गुंडाळून लोक घराबाहेर पडत आहेत. सूर्य आग ओकत असून उष्ण झाडांनी नागरिक हैराण झाले आहेत.
शनिवारी मराठवाड्यात सामान्य तापमानाचा तुलनेत अधिक उष्णतेची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी 40 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचले होते. किमान तापमान हे 26 ते 30 च्या घरात गेले असून काल 29 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदवले गेले.
हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार 30 मे पर्यंत नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार असून त्यानंतर हळूहळू तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज रविवारी दिलेल्या हवामान विभागाच्या तापमान अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 42.8 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचे शक्यता आहे.