पुणे : काल (ता. २६) झालेल्या गारपिटीमुळे राज्यातील विविध भागांतील फळपीके आणि रब्बी हंगामातील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे तर ऐन बहाराच्या काळात नुकसान झाले असून आस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. तर अवकाळी पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, गारपिटीने नगर जिल्ह्यातील अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर एक फुटापर्यंत गारांचा थर लागला होता. यामुळे कांदा, तूर, भात, कापूस, भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर उसाचे आणि उभे असलेले पीक वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले आहे. तर द्राक्षांच्या बागांचा पाला गारांमुळे पुर्णपणे झडला आहे.
कांद्याच्या चाळीमध्ये पाणी गेल्यामुळे अक्षरश: डोळ्यादेखत कांदा पावसात भिजताना शेतकऱ्यांना पाहावा लागला. तर नुकताच लागवड केलेला कांदा आणि लागवडीयोग्य झालेले कांद्याचे रोपही जोरदार पावसामुळे उन्मळून पडले आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बीतील कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
पंचनामे करण्याचे आदेश
गारपिटीने नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर महसूल आणि कृषी विभागाकडून संयुक्तपणे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल शासनदरबारी गेल्यानंतर भरपाई देण्याचा निर्णय केला जाणार असून शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर परिसरात अंदाजे ३.५ हजार हेक्टरवरील शेतपिकाचे नुकसान झाले आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील अंदाजे ८.५ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, ज्वारी यांचे जरी नुकसान तुलनेने कमी झाले असले तरी काढणीला आलेल्या पीकांचे जसे की, फळबागा, तुरी, कापूस, आंबा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार पंचनामे करण्यास कृषी विभागाकडून सुरूवात करण्यात आली आहे.
- रफिक नाईकवाडी (विभागीय सहसंचालक, पुणे)