Join us

Climate Change: उष्माघाताचे २० टक्के मृत्यू भारतात, सर्वाधिक मृत्यू होतात इथे..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 9:30 AM

दरवर्षी जगभरात दीड लाख बळी; तापमानवाढ व हवामान बदलाचा परिणाम

हवामान बदलांचा परिणाम म्हणून जगभरात उष्णतेच्या लाटांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा फटका म्हणून उष्माघाताने जगभरात दरवर्षी दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे या मृत्यूंपैकी सुमारे २० टक्के मृत्यू एकट्या भारतात होत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला.

उष्माघाताचे सर्वाधिक मृत्यू कुठे?

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाने इंग्लंडमधील एमसीसी रिसर्च नेटवर्कच्या साह्याने जगातील ४३ देश आणि ७५० ठिकाणांच्या कमाल तापमानाचा व तेथील मृत्यूंचा १९९० पासून ते पुढच्या ३० वर्षांचा म्हणजेच २०१९ पर्यंत अभ्यास केला. त्यानुसार दरवर्षी जगात मृत्यू होणाऱ्या सुमारे १.५३ लाख लोकांपैकी सर्वाधिक २० टक्के मृत्यू भारतात, तर त्यापाठोपाठ चीन आणि रशियात उष्माघाताने मृत्यू होतात. याबाबतचे संशोधन पीएलओएस मेडिसीन या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे. उष्माघाताचे वाढत्या प्रमाणास हवामान बदल, तापमानवाढ आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन त्यास कारणीभूत असल्याचे संशोधकांनी त्यांच्या शोधप्रबंधात म्हटले आहे.

पृथ्वीचे तापमान दर दशकात वाढते

१९९९ ते २०१९ दरम्यान, जगभरात तीव्र उष्णतेच्या दिवसांच्या सरासरी संख्येत वाढ झाली आहे. हा आकडा सरासरी १३.४ दिवसांवरून १३.७ दिवसांपर्यंत वाढला आहे. याशिवाय पृथ्वीवरील तापमान दर दशकात ०.३५ अंश सेल्सिअसने वाढल्याचेही आढळून आले आहे.

संशोधकांनी सांगितले की, २ याआधीच्या अभ्यासात स्थानिक पातळीवर उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यूबद्दल सांगण्यात आले होते. परंतु, त्यात जगभरात होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. ती आता नमूद केली आहे.

उष्माघाताचे मृत्यू तरी किती?

■ उष्णतेमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश

■ जगातील एकूण मृत्यूंपैकी एक टक्के

■ एकूण मृत्यूंपैकी ५० टक्के मृत्यू आशियात, तर ३० टक्के मृत्यू युरोपात होतात.

■ कोरड्या हवामानात आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या भागात सर्वाधिक मृत्यूदर

१० लाखांमागे २३६ मृत्यू

जगभरात १९९० ते २०१९ दरम्यान दरवर्षी सरासरी १,५३,०७८ लोकांचा मृत्यू झाला. जगभरातील प्रत्येक १० लाख लोकांपैकी २३६ लोकांचा उष्माघाताने मृत्यू होतो, अशी बाब मोनाश विद्यापीठाच्या संशोधनात आढळून आली आहे.

राज्यात दोन दिवस उष्णतेची लाट, तर कुठे गारपिटीसह पाऊस

मागच्या काही दिवसांत राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, काही भागात वादळवाऱ्यासह पाऊस आणि काही भागात उष्णतेची लाट होती. पुढील दोन दिवसही राज्यात असेच वातावरण राहण्याचा अंदाज अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात काही भागात तुरळक किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची, तर काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळवारे वाहण्याचा, तर काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कसे असेल वातावरण?

■ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

■ पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, लातूरमध्ये मेघगर्जनेसह वादळवारे वाहतील.

■ नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

■ मुंबईत उष्ण आणि दमट हवामान परिस्थिती असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टॅग्स :हवामानतापमान