हवामानाच्या टोकाच्या होणाऱ्या बदलांचा व तापमान वाढीचा पक्ष्यांच्या अधिवासावर मोठा परिणाम होत असल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासातून नुकतेच समोर आले आहे. वाढत्या तापमान वाढीमुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असून जगभरातील शेतांमधील झाडांवरील पक्ष्यांची घरटी कमी होत असल्याचे या नवीन अभ्यासात आढळून आले.
जगभरात वेगवेगळी विद्यापीठे तसेच संशोधन संस्था हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांविषयी अभ्यास करत आहेत. त्यामध्ये येणारे निष्कर्ष हे भिषण असल्याचेच दिसून येत आहेत. नुकतेच उभयचर प्राण्यांचे अस्तित्वही धोक्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले होते. त्यानंतर झालेल्या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आलेल्या पक्ष्यांच्या अधिवासाचा व एकूण जैवविविधतेचा होणारा ऱ्हास हा भयावह वाटणारा आहे.
वाढत्या तापमानाचा पक्ष्यांवर परिणाम
वातावरणातील बदल, विशेषत: तापमान वाढीच्या अनेक घटना घडत असताना वाढलेल्या उष्णतेचा परिणाम पक्ष्यांवर होतो का हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे.
या अभ्यसानुसार, तापमान वाढीमुळे शेतजमिनीजवळ राहणाऱ्या पक्ष्यांमध्ये लक्षणीय घट दिसून आली आहे.शहरातहील पक्ष्यांची घरटी कमी होतानाचे चित्र असून जंगलातील पक्ष्यांवर होणारा परिणाम हा त्यापेक्षा कमी आहे. सुमारे दीड लाखांहून अधिक घरट्यांच्या संख्येचे परिक्षण केल्यानंतर संशोधकांना असे दिसून आले की, जेंव्हा तापमान वाढते तेंव्हा पक्ष्यांची पिल्लू जगवण्याची क्षमता ४६ टक्क्यांनी कमी होते.
वारंवार होणाऱ्या उष्णतेच्या लाटांचा पक्ष्यांच्या घरट्यांवर विपरित परिणाम होत आहे, असेही हा अभ्यास सांगतो. त्यामुळे घराच्या दारासमोर, झाडांवर असणारा पक्ष्यांचा किलबिलाट कमी होणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.