Join us

Climate Change Migration: अस्मानी संकटामुळे लाखो लोकांनी सोडले घर, या अहवातलात नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:58 PM

नैसर्गिक आपत्तीचा कहर; चक्रीवादळ, भूकंप आणि महापुरामुळे ५ लाख लोकांचे स्थलांतर

२०२३ या वर्षभरात महापूर, वादळ, भूकंप आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे भारतातील सुमारे ५ लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर झाले. २०२२ मध्ये याच कारणामुळे देशात २५ लाख लोकांचे स्थलांतर झाले होते, अशी माहिती जीनिव्हा येथील इंटर्नल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटरच्या अहवालात देण्यात आली आहे.

अरबी समुद्रातील बिपरजॉय वादळामुळे, गुजरात व राजस्थानमध्ये सुमारे १ लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करावे लागले. मोचा वादळामुळे भारता व बांगलादेशमध्येही सुमारे १३ लाख लोकांवर स्थलांतराची वेळ आली होती. २०२३ मध्ये अल- निनोच्या प्रभावामुळे भारतात वादळाचा फारसा परिणाम जाणवला नाही; परंतु दक्षिण आशियात मात्र यामुळे १८ लाख लोकांचे विस्थापन झाले होते.

नैसर्गिक आपत्ती वाढणार

* हवामान बदलामुळे देशात पूर व उष्णतेचे लाट येण्याचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात त्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता गांधीनगर आयआयटीने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात म्हटले होते.

* वातावरणात हरितवायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे आणि हवामान बदलाचा परिणाम म्हणून वादळीवारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसांच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात चक्रीवादळाचा वेग तीव्र होण्यासह त्याचा कालावधी वाढण्याचेही प्रमाण वाढले आहे.

ठिकठिकाणी विध्वंस

■ हिमाचल प्रदेश आणि उत्तरा- खंडमध्ये मागील वर्षी महापु- रांमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला.

■ ऑक्टोबर २०२३ मध्ये सिक्कीममध्ये जलविद्युत प्रकल्प फुटून जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला व त्याचा परिणाम सुमारे ८८ हजार लोकांवर झाला.

■ दिल्लीत यमुनेच्या पुरामुळे दरवर्षी परिसरातील २७ हजारांहून अधिक लोकांना स्थलांतरित करावे लागते.

टॅग्स :हवामानस्थलांतरणचक्रीवादळ