Join us

Climate Change : हवामान बदलामुळे धुक्याचा पिकांवर काय होतोय परिणाम ते वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 3:43 PM

गेल्या दोन दिवसांपासून सकाळी पडलेल्या धुक्याच्या साम्राज्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या धुक्यांचा पिकांवर काय परिणाम होईल ते वाचा सविस्तर (Climate Change)

Climate Change : 

हिमायतनगर : गेल्या दोन दिवसांपासून सकाळी पडलेल्या धुक्याच्या साम्राज्याने वाहनधारक, पादचाऱ्यांसह शेतकरी, नागरिक हैराण झाले. बुधवारी व गुरुवारी पडलेल्या धुक्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची चिंता लागली आहे.

प्रामुख्याने कापूस, तूर व फळबागांना हळद व रब्बीच्या पेरणी झालेल्या गहू, हरभरा आदी पिकांना धोका होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तत्काळ शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणी होत आहे.

एकीकडे राज्यात नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वादळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळात तडाखा, यामुळे शेतकरी व प्रशासन त्रस्त आहे. त्यातच परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळेच की काय..? आता दोन दिवसांपासून हिमायतनगर तालुका परिसर सकाळी धुक्याने व्यापला गेल्याचे चित्र दिसून येत आहे. 

१०० फुट दूरवरील व्यक्ती अथवा परिसर दिसत नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. बहरात आलेल्या कापसाची चाफी गळती होऊन पिकांवर लाल्या आणि मावा रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

फुलावर आलेल्या तूर पिकाला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पादनात घट निर्माण झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या धुक्यामुळे पिके हातची जाण्याचा धोका वाटत आहे. दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या नुकसानीचा मोबदला द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

हरभरा पीक उगवण होत नसल्याने शेतकरी त्रस्त

• बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बीचे पीक घेण्यासाठी लगबग चालू झाली आहे. अनेक शेतकरी हरभरा पेरून मोकळे झाले, पण १९ ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पेरलेले पीक उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटामध्ये शेतकरी सापडला आहे.

• शेतकऱ्यांनी सोयाबीनसारखे पीक काढून घेतले. सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण अधिक होते, म्हणून शेतकरी सोयाबीन वाळविण्यासाठी लगबग करत असताना पावसाने हजेरी लावली.

धुक्याच्या साम्राज्याने शेतकरी हैराण 

१. आदमपूर : गेल्या दोन दिवसांपासून सकाळी पडलेल्या भयंकर धुक्याने शेतकरी व नागरिक हैराण झाले आहेत. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७वाजेपर्यंत असलेल्या धुक्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पिकाची चिंता लागली आहे. प्रामुख्याने कापूस, तूर व फळबागांना धोका होण्याची शक्यता आहे. 

२. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानाचा मोबदला  मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट मदत द्यावी, अशी मागणीदेखील होऊ लागली आहे.

३. एकीकडे राज्यात नैसर्गिक आपत्ती गारपीट, वादळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतकरी व प्रशासन त्रस्त आहे, त्यातच परतीच्या पावसाने लावलेली जोरदार हजेरी यामुळेच की काय..? आता दोन दिवसांपासून बिलोली तालुक्यातील आदमपूरसह परिसर सकाळच्या वेळी धुक्याने व्यापला गेल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसा गरम, रात्रीला थंड, सकाळच्या प्रहरी धुक्याचे साम्राज्य राहात आहे.

४. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडणारे शेतकरीसुद्धा नेहमीपेक्षा तासभर उशिरा शेतीकामासाठी बाहेर पडत आहेत. बहरात आलेल्या कापसाची चाफी गळती होऊन पिकांवर लाल्या आणि मावा रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुरीचे फुल करपून या पिकाला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसशेतकरीशेती