हवामान बदलामुळे जगातील अन्न उत्पादन आणि सुरक्षेचे भवितव्य आधीच धोक्यात आले असताना मजुरांच्या उत्पादकतेवरही परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर येत आहे.
अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामधील विद्यापीठांच्या संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासातून दिसून आले आहे की,वाढत्या तापमानात मजूरांच्या शारीरीक कार्यक्षमता कमी होत आहेत. भारतासारख्या अन्न उत्पादक देशांमध्ये आधीच मजूरांचे उपजीविकेचे प्रश्न गंभीर होत असताना आता उत्पादकता ४० टक्क्यांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नुकतेच समोर आलेल्या अहवालांनुसार, २०२३ वर्ष हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. वाढते तापमान जगातील सर्व देशांची डोकेदुखी ठरत असताना या अहवालाने या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.
तापमान वाढीने मजूरांच्या शारिरावर परिणाम
ग्लोबल चेंज बायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या मजूरांच्या शारिरीक क्षमतांवर होणाऱ्या परिणामांचा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यानुसार हवामान बदलामुळे शतकाच्या शेवटी भारतातील इंडो-गंगेच्या मैदानात मजूरांची काम करण्याची क्षमता ४० टक्क्यांपर्यंत घसरू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अन्नसुरक्षेवर मोठा परिणाम
अग्नेय आणि दक्षिण आशिय, पश्चिम आणि मध्य आफ्रिका आणि उत्तर दक्षिण अमेरिकेतील भागांमध्ये शारीरिक कामाची क्षमता ७० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. शेतीत उत्पादित होणाऱ्या अन्नाची मजूर कापणी करतात. शेतात हे काम करण्याची त्यांची क्षमता कमी झाल्यामुळे येणाऱ्या काळात अन्न सुरक्षेवर मोठा परिणाम होईल. हवामान बदलाच्या विविध परिणामांमुळे पीक उत्पादनातल्या अडचणी वाढणार आहेत.
कार्यक्षमता घटतेय..
जमीनीची मशागत करणे, खुरपणी, कापणी अशा अनेक कष्टाच्या कामे करणाऱ्या मजूरांना उष्णतेच्या वाढत्या ताणाचा जास्त धोका आहे. वाढत्या तापमानामुळे मजूरांच्या शरीराच्या तापमानात वाढ होत असल्याने त्यांची कार्यक्षमता कमी होत असल्याचे समोर येत आहे.
कामाची क्षमता सुमारे २० अंशापेक्षा अधिक तापमानात घटू लागते. तापमान, आर्दता आणि सौर किरणांच्या वाढत्या प्रभावामुळे ती आणखी घटते असे या संशोधनात सांगण्यात येत आहे.